भरवीर ते इगतपूरी या समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण  

समृद्दी तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण www.pudhari.news

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्र राज्याचा नावलौकिक हा समृद्धी महामार्ग असुन इगतपुरी ते मुंबई या उर्वरित टप्प्याचे काम ऑगस्ट महिन्यात पूर्ण होऊन चालू होईल. अनेक तीर्थ पर्यटन स्थळ या महामार्गामुळे जोडले जाणार आहे. समृद्धी महामार्गावर ज्या काही दुर्घटना झाल्या त्या महामार्गामुळे झाल्या नसुन वाहन चालकांनी वेग मर्यादा पेक्षा जास्त वेगाने चालवणे, मद्यपान, झोप लागणे यामुळे ९५ टक्के अपघात झालेले आहेत. विशेष म्हणजे जेवढ्या भागाचा वापर होईल तेवढ्याच भागाचा टोल आकारला जाईल. महामार्गाचा मोठा उपयोग शेतकरी आणि नागपूर मुंबई जोडण्यासाठी होईल. घरांचे प्रकल्प, कृषी, औद्योगिक डेव्हलपमेंट महामार्गालगत असलेल्या १६ ठिकाणी होणार असुन उर्वरीत किरकोळ कामही लवकर होणार आहे. जगाच्या पाठीवर भारताला तीन नंबर बनविण्यासाठी महाराष्ट्र आघाडीवर असुन महाराष्ट्रात अजून १२ प्रकल्प प्रस्तावित आहेत असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी केले. नागपुर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या लोकार्पण प्रसंगी दादा भुसे बोलत होते.

इगतपुरी येथील नांदगाव सदो येथे तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. भरवीर ते इगतपूरी या तीस-या टप्प्याचे लोकार्पण झाल्यामुळे मुंबईला आता वेगाने पोहचता येणार आहे. ७०१ किमी अंतरापैकी ६२५ किमी पर्यंत काम पूर्ण झाले आहे. स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा सोमवार दि. ४ रोजी सुरू करण्यात आला आहे. हा महामार्ग एकूण ७०१ किलोमीटर लांबीचा आहे. यातील ६०० किलोमीटर लांबीच्या दोन टप्पे अगोदरच सुरू झालेले आहेत. आता भरविर ते इगतपुरी या २५ किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

वेळेची बचत होईल : डॉ. भारती पवार

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार बोलतांना म्हणाल्या की, हवाई जहाजातून पाहिलं तर समृद्धी महामार्गच सौंदर्य नजरेत भरते. प्रवाशांसह आम्हालाही समृद्धीमुळे लवकर कुठेही पोहचता येईल. बैठका आणि कार्यक्रमाला लवकर पोहचता यावे यासाठी पुढच्या टप्प्याचे काम लवकर पूर्ण करून लवकर लोकार्पण करावे अशी मागणी त्यांनी केली.

समृद्धी महामार्ग महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणार : भुजबळ

छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आपल्या भाषणात म्हणाले की, आपल्या नाशिकचे दादा भुसे ह्या विभागाचे प्रमुख आहेत. दादा भुसे सर्व रस्ता चेक करून आले आहे. हा जो समृध्दी महामार्ग आहे त्याचे उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले. आपल्या इगतपूरी इंटरचेंजचा वापर करून वाहन चालकांना फायदा होईल. शेतीला फायदा होईल, आता वेगवेगळ्या डेव्हलपमेंट होत असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. या रस्त्यामुळे अपघात होत नाही तर लाईन व्यवस्थित वापरत नाही म्हणून अपघात होत आहेत. चालकांनी नियम पाळले नाही म्हणून अपघात होतात. हे सगळे ड्रायव्हिंग सेन्समुळे होते, या सगळ्या गोष्टी सांभाळून गाड्या चालवल्या पाहिजे. मी येथील बोगदा दीड वर्षांपूर्वी पहिला होता, माझी विनंती आहे की भिवंडी बायपास देखील लवकर पूर्ण करावा, त्यामुळे मुंबईला जाताना व नाशिकडे येतांना उशीर होत असल्याने मी कधी कधी रेल्वेने येतो. एक नाशिककर म्हणून व तुम्ही ही नाशिककर आहेत म्हणून या अडचणी सांगतो. आपल्याला यावे जावे लागते म्हणुन तसेच नाशिकचे दादा साहेब तुम्ही असल्याने आम्ही हक्काने तक्रारी करत आहोत. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे काम करून द्यावे अशी मागणी भाषणात छगन भुजबळ यांनी केली. तर भुजबळ यांनी मागणी करताच भुसे यांनी उठून पावसाळ्यापूर्वी ९० टक्के काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो, फांगुळगव्हाण, पिंप्रीसदो येथील शेतकऱ्यांच्या जमिनी या समृद्धी मार्गात गेल्या असुन येथील स्थानिक युवकांना टोल नाक्यावर रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच समृद्धीचे काम करणाऱ्या अनेक ठेकेदारांची बिले बाकी आहेत ते तातडीने देण्यात यावी अशी मागणी आमदार हिरामण खोसकर यांनी आपल्या भाषणात केली. इगतपुरी ते आमणे या ७६ किलोमीटर रस्त्याचे कामही पूर्ण होत असून त्याचेही उद्घाटन लवकरच होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आता नागपूरहून मुंबई दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना व मुंबईहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना २० किलोमीटरच्या अत्यंत दुरवस्था झालेल्या रस्त्याचा मनस्ताप सहन करावा लागणार नसून वाहतूक कोंडीतूनही सुटका होणार आहे.

यावेळी व्यासपिठावर आरोग्य कुटूंब कल्याण मंत्री डॉ भारती पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, अनिल कुमार गायकवाड, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, शिवराम झोले, पांडुरंग गांगड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर लहाने, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, अजय बोरस्ते, गोरख बोडके, रघुनाथ तोकडे, संपतराव काळे यांच्यासह रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी समृद्धीचे काम करणारे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post भरवीर ते इगतपूरी या समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण   appeared first on पुढारी.