लिलावातून कमी किमतीत जागा देण्याचे आमिष दाखवून सव्वा कोटीचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-बँकेने जप्त केलेली मालमत्ता लिलावात कमी किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाने व्यावसायिकास सुमारे सव्वा कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहेत.

भाऊसाहेब गिरासे (४३, रा. वडाळा पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित ललित निकम (रा. इंदिरानगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताने १७ जुलै २०२२ ते २१ मार्च २०२३ या कालावधीत गंडा घातला. संशयित निकमने गिरासेंना दि. १२ जुलै २०२२ रोजी पंचवटीत भेटावयास बोलावले होते. पंजाब नॅशनल बँकेकडे तारण असलेली सातपूर औद्योगिक वसाहतीतील १ हजार ३८५ चौमी क्षेत्रफळ असलेली व त्यावर ७६५ चौमी आरसीसी बांधकाम असलेली मिळकत लिलावातून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यासाठी बँकेशी तडजोड करीत लिलावातून कमी किमतीत ही मालमत्ता तुम्हाला देतो असे निकमने गिरासे यांना कबूल केले होते. यासाठी निकमने मालमत्ता व लिलावाच्या व्यवहारासाठी लागणारी कागदपत्रे बनावट तयार करीत ती खरी असल्याचे भासवले होते. त्यानंतर गिरासेंचा विश्वास संपादन करून वेगवेगळ्या कारणांनी एक कोटी २७ लाख ६५ हजार रुपये घेतले. मात्र त्यानंतर गिरासे यांना मिळकत मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी निकमकडे पाठपुरावा केला. तसेच पैसेही परत मागितले. मात्र निकमने पैसे न देता गंडा घातला.

तक्रार दिल्यानंतर गुन्हा

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गिरासेंनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यात तथ्य आढळल्याने पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या सूचनेने पंचवटी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे.

हेही वाचा :

The post लिलावातून कमी किमतीत जागा देण्याचे आमिष दाखवून सव्वा कोटीचा गंडा appeared first on पुढारी.