लोकसभेतून काँग्रेसची गोळाबेरीज, विधानसभेसाठी मध्य मतदारसंघातून चाचपणी

काँग्रेस पक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत शहरातून काँग्रेस पक्षाचा उमेदवार नसला तरी महाविकास आघाडीच्या उमेदवारास काँग्रेस पक्षाची साथ आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने विधानसभेच्या नाशिक मध्य मतदारसंघाची चाचपणी सुरू केल्याचे चित्र आहे. कारण गत दोन पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीत मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या मतांचा टक्का भाजपच्या तुलनेने चढता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्याचा फायदा विजयात रूपांतरित करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील राहील.

नाशिक जिल्ह्यात भाजप, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांसह राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे व काही प्रमाणात माकपचे मतदारसंघनिहाय वर्चस्व आहे. त्यानुसार लोकसभेच्या निवडणुकीत या पक्षांनी त्यांचे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. काँग्रेस पक्षाचा नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवार नसला तरी त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचे अस्तित्व भक्कम करण्यासोबतच मतदारसंघाची बांधणी करण्याची संधी आली आहे. विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्यमध्ये काँग्रेसकडून उमेदवारीचा दावा असेल. या वेळीदेखील विजयाच्या उद्देशाने काँग्रेस पक्ष निवडणुकीत उतरेल. मात्र त्याची पूर्वचाचणी लोकसभेच्या निवडणुकीत होणार आहे. नाशिक मध्य मधून महाविकास आघाडीच्या उमेदवारास किती मते मिळतात त्यावर काँग्रेसची विधानसभा वाटचाल खडतर की सोपी हे कळेल. २०१४ मध्ये नाशिक मध्यमध्ये काँग्रेसच्या उमेदवारास एकूण मतदानाच्या १६.४२ टक्के मतदान झाले होते. तर २०१९ मध्ये त्यात वाढ होऊन २९.०१ टक्के मतदान झाले. त्यामुळे मतदानाचा वाढता टक्का काँग्रेससाठी आशादायक आहे. त्यातच मतांची वाढती टक्केवारी भाजपपेक्षा अधिक असल्याने काँग्रेससाठी हे सकारात्मक वातावरण दिसते. त्यातच काँग्रेसचे नेते व खा. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्राही नाशिक मध्य मतदारसंघातून गेली. त्यामुळे या यात्रेचा प्रभाव लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कसा पडतो याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.

गत दोन पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीतील पक्षनिहाय मतदान (कंसात एकूण मतांची टक्केवारी)

पक्ष                    २०१९                         २०१४

भाजप              ७३,४६० (४७.३०)              ६१,५४८ (३८.२८)

काँग्रेस              ४५,०६२ (२९.०१)            २६,३९३ (१६.४२)

मनसे            २२,१४० (१४,२६) —           ३३,२७ (२०.७०)

हेही वाचा :

The post लोकसभेतून काँग्रेसची गोळाबेरीज, विधानसभेसाठी मध्य मतदारसंघातून चाचपणी appeared first on पुढारी.