वैभव लहामगेच्या पोलिस कोठडीत वाढ

पोलिस कोठडी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कुस्तीपटू भुषण लहामगे याची निर्घृन हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या वैभव यशवंत लहामगे याच्या पोलिस कोठडीत मंगळवारपर्यंत (दि.२१) वाढ करण्यात आली आहे. तर वैभवच्या आई वडिलांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हत्येत प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या दोघांचा शोध पोलिस घेत आहेत.

नाशिक मुंबई महामार्गावरील राजूर फाटा परिसरात कुस्तीपटू भुषण दिनकर लहामगे (४०, रा. सांजेगाव, ता. इगतपुरी) यांची शुक्रवारी (दि.१०) मारेकऱ्यांनी धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली. भुषण यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार, जागेच्या वादातून आणि आर्थिक कारणावरून संशयित यशवंत लहामगे, वैभव लहामगे, सुमनबाई लहामगे यांनी कट रचून भुषणची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. न्यायालयाने तिघांनाही गुरुवारपर्यंत (दि.१६) पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने तिघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता वैभवच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. तर इतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या हत्येत वैभवसोबत सतीश चौधरी व रतन जाधव (दोघे रा. सिडको) या दोघा संशयितांचाही सहभाग समोर आला आहे. या दोघांनीच जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत घरफोडी करून सुमारे पाच कोटी रुपयांचे दागिने चोरल्याचे उघड झाले. दोघे संशयित फरार असून शहर व ग्रामीण पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.