शिवसेनेचे वाघ नसते, तर हिंदुत्वावरील कलंक दूर झाला नसता : खासदार राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

काही लोक म्हणतात की, राममंदिर लढ्यात शिवसेनेचे योगदान काय, त्यांच्यासाठी अयोध्येतील कारसेवेवरील ‘रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ’ हे दालन खुले करण्यात आले आहे. डोळे उघडे ठेवा आणि हे पाहा, अशा शब्दांत भाजपवर टीका करत, शिवसेनेचे वाघ नसते, तर या हिंदुत्वाला जो अनेक वर्षांपासून कलंक होता तो दूर झाला नसता, असा दावा शिवसेने(उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे खासदार संजय राऊत यांनी केला.

शिवसेने(उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे राज्यस्तरीय महाअधिवेशन मंगळवारी (दि. २3) त्र्यंबकरोडवरील हॉटेल डेमोक्रसी येथे होत आहे. तत्पूर्वी अयोध्येतील श्रीरामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शिवसैनिकांनी कारसेवेत निभावलेल्या भूमिकेविषयी ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून अधिवेशनस्थळी आयोजित ‘रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ’ या प्रदर्शनाचे उद्घाटन खा. राऊत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले की, या प्रदर्शनाची संकल्पना सुभाष देसाई यांची आहे. त्यांनी या प्रदर्शनासाठी अत्यंत मेहनत घेतली. अधिवेशन करायचे ठरले, तेव्हा त्यांच्या डोक्यात असे आले की, अयोध्येला आपण जात नाहीये. अयोध्येच्या राम मंदिर संघर्षात शिवसेनेचे जे योगदान आहे, ते सगळ्यांना माहीत व्हावे. ते म्हणाले की, आपण पाहिले असेल की, तरुणपणीचे सुभाष देसाई आपल्याला दिसले होते. शाळेतला मुलगा दप्तर घेऊन जातो. तसे ते पाठीला हत्यार बांधून चाललेले होते. त्यावेळी मनोहर जोशी, चंद्रकांत खैरे आदी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. हा आमचा ठेवा आहे. काही लोक म्हणतात की, शिवसेनेचे योगदान काय, त्यांच्यासाठी हे दालन खुले, डोळे उघडे ठेवा आणि हे पाहा, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. शिवसेनेचे वाघ नसते, तर या हिंदुत्वाला जो अनेक वर्षांपासून कलंक होता, तो दूर झाला नसता. आता कोणी कितीही श्रेय घेऊ द्या. हे फार घाईने झालेले प्रदर्शन आहे. यात अजून सुधारणा होतील. संपूर्ण महाराष्ट्र हे बघेल. सुरुवात आम्ही नागपूरपासून करणार कारण देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे की, त्यांच्या काही स्मृतींना उजाळा मिळावा.

प्रदर्शनातून भाजपवर टीका

या प्रदर्शनामध्ये बाबरी मशीदचा पाडलेला ढाचा, आंदोलनात शिवसेनेचे योगदान, बाळासाहेब ठाकरेंची त्याबाबतची भूमिका याबाबत माहिती देणारे होर्डिंग, चित्रफीत तर आहेच मात्र त्याबरोबरच भाजपवरही होर्डिंग्जच्या माध्यमातून टीका करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

कारसेवक फोटो ट्विटवरून खा. राऊत यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना डिवचले. ते म्हणाले की, संपूर्ण देशातील रामसेवक तिथे हजर होते. त्यावेळेस सगळे हिंदू म्हणून जमले होते. तेव्हा पक्ष नव्हता, तीन प्रमुख नेते होते. ते म्हणजे अशोक सिंगल, बाळासाहेब ठाकरे आणि लालकृष्ण अडवानी त्यांनी आंदोलन पुढे नेले. लोकांना प्रेरणा देण्याचे काम केले. सामान्य लोकांना प्रेरित करण्याचे काम बाळासाहेब ठाकरेंनी केले. काही लोक नागपूरची ट्रेन पकडायला गेले, ते फोटो दाखवताय मात्र अयोध्येत शिवसैनिक पोहोचले होते, असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

हेही वाचा:

The post शिवसेनेचे वाघ नसते, तर हिंदुत्वावरील कलंक दूर झाला नसता : खासदार राऊत appeared first on पुढारी.