सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला नाशिक शहरात संमिश्र प्रतिसाद 

नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या उपोषणावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचे तीव्र पडसाद संपुर्ण राज्यभर उमटले. नाशिक येथेही सकल मराठा क्रांती मोर्चाकडून रविवारी (दि. ३) नाशिक बंदची हाक दिली होती. या बंदला नाशिकमधील व्यावसायिकांनी संमिश्र प्रतिसाद दिला. सकल मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सकाळी शहरातील मध्यवर्ती भागात मोर्चा काढत व्यावसायिकांंना बंद पाळण्याचे आवाहन केले.

यावेळी संघटनेचे करण गायकर, सुनिल बागूल, विलास शिंदे, राम खुर्दळ, दत्ता गायकवाड यांसमवेत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. विविध मराठा संघटनांनी ठिकठिकाणी एकत्र येत आंदोलन केले होते. याचवेळी संघटनांनी रविवारी (दि. ३) राज्य बंदची हाक दिली होती. नाशिकमध्येही सर्व संघटनांनी एकत्र येत हा बंद यशस्वीतेसाठी प्रयत्न केला मात्र व्यावसायिकांनी या बंदला संमिश्र प्रतिसाद दिला.

पायी मोर्चाद्वारे बंदचे आवाहन

यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पायी मोर्चा काढत बाजारपेठांमधील व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. या मोर्चामध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता. महिलांनी या मोर्चाचे नेतृत्व करत घोषणाबाजी केली.

घोषणाबाजीने दुमदुमला परिसर

पायी मोर्चाच्या दरम्यान या सरकारचे करायचे काय…, गृहमंत्री राजीनामा द्या…, आरक्षण आमच्या हक्काचे…, छत्रपती शिवाजी महाराज की जय… डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा विजय असो.. अशा घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता.

महिलांनी केले दुकाने बंद

यावेळी महात्मा गांधी रस्त्यावरील काही व्यावसायिकांनी दुकाने बंद करण्याबाबत विरोध दर्शवल्याने मोर्चातील महिलांनी स्वत: दुकानांचे शटर खाली खेचले. यावरून पोलीसांसोबत कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली.

पोलिस-कार्यकर्त्यांत तणाव

पायी मोर्चाचा मार्ग शालीमारवरुन महात्मा गांधी मार्ग असताना कार्यकर्त्यांनी अचानक मेनरोडकडे जाण्याचा निर्णय घेतल्याने काही काळ पोलिस आणि कार्यकर्त्यांत तणावाचे वातावरण तयार झाले होते. यावेळी चर्चेतून मार्ग काढत पोलिसांनी मेनरोडकडून मोर्चा नेण्यास परवानगी दिली.

गृहमंत्र्यांनी घटनेची जबाबदारी स्विकारत राजीनामा द्यावा. अन्यथा ज्या एसपींनी लाडीचार्जचे आदेश दिले त्यांचे निलंबन करावे. मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहीजे. त्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने काम करताना पोलीसांनी जनरल डायरसारखे वागू नये. मागण्या मान्य न झाल्यास सकल मराठा समाज आता निर्णायक आंदोलन उभारेल.

– करण गायकर, पदाधिकारी सकल मराठा समाज

लोकशाहीमध्ये मागण्या मांडण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्याचा वापर करत जालनामध्ये आंदोलन सुरु होते. शांततेचा भंग पोलिसांनी केला असून अनेक मराठा बांधव-भगिणी जखमी झाल्या आहेत. त्यामुळे आता बंदची हाक दिली आहे. मागण्या मान्य न झाल्यास वाईट परिणाम होतील.

– सुनील बागूल, पदाधिकारी सकल मराठा समाज

हेही वाचा :

The post सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला नाशिक शहरात संमिश्र प्रतिसाद  appeared first on पुढारी.