नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत देशातील मतदारराजाने एकाही पक्षाला स्पष्ट बहुमताचा कौल न दिल्याने, देशात एनडीएसह इंडिया आघाडीकडून सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपसह काँग्रेसकडून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आकडेमोड केली जात असतानाच, देशात कोणासमोर काय पर्याय आहेत, याची खमंग चर्चा सध्या चौकाचौकात रंगत आहे. चर्चेत सत्तास्थापनेची ‘मॅजिक फिगर’ गाठण्यासाठी इंडिया आघाडीसमोर काय पर्याय आहेत तसेच नितीश कुमार व चंद्रबाबू नायडू यांनी दगाफटका केल्यास, भाजप बहुमताचा आकडा कसा गाठेल, याची आकडेमोड आता चौकाचाैकात केली जात आहे.
चारशे पारचा नारा देऊन मैदानात उतरलेल्या भाजप व एनडीए आघाडीला तीनशे पारचा आकडा गाठण्यात सपशेल अपयश आले आहे. याउलट मागील दोन्ही पंचवार्षिक निवडणुकांत पानिपत झालेल्या विरोधकांनी जोरदार मुसंडी मारत भाजपच्या विजयीरथाला काहीसा लगाम लावला आहे. निकालात एनडीएला सत्तास्थापनेसाठी बहुमत दिले असले, तरी एनडीएमधील घटक पक्षांना फोडून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा आटापिटा इंडिया आघाडीकडून केला जात आहे. ५४३ खासदारांपैकी २७२ खासदारांची गरज सत्तास्थापनेसाठी आहे. एनडीएने २९२ जागांसह बहुमत मिळविले असले, तरी एनडीएमधील घटक पक्ष असलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीचे १६ खासदार व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूचे १२ खासदार सत्तास्थापनेचा मार्ग सुकर करणार आहेत. कारण या दोन नेत्यांच्या पक्षांचे खासदार २९२ मधून वजा केल्यास एनडीएच्या जागा २६४ वर येत असून, सत्तास्थापनेच्या मॅजिक फिगरपासून ते दूर जात आहेत. इंडिया आघाडीकडून नेमकी हीच संधी साधून, २३४ वरून २७२ चा आकडा गाठण्यासाठी फोडाफाेडीचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या जोर-बैठका सुरू असून, फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, देशातील सत्तास्थापनेचा खेळ बघता, चौकाचौकात याबाबतच्या चर्चा रंगत आहेत. चर्चेत एनडीएने सरकार स्थापन करावे असा मतप्रवाह असून, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इंडिया आघाडीने देशातील सर्व घटक पक्ष व अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करावे असा दुसरा मतप्रवाह असल्याचे दिसून येत आहेत. यासाठी जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या अपक्ष खासदारांबाबतही आकडेमोड केली जात आहे.
अपक्ष विशाल पाटील कोणाचे?
सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले राज्यातील एकमेव अपक्ष खासदार विशाल पाटील कोणाचे? यावरही जोरदार चर्चा रंगत आहेत. विशाल पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारून त्यांच्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे त्यांनी एनडीएसोबत जावे, अशी चर्चा रंगत आहे, तर काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळेच ते निवडून आले आहेत, त्यामुळे ते काँग्रेसचेच खासदार असल्याचेही नागरिकांकडून बोलले जात आहे.
चंद्राबाबू, नितीश कुमारांवर अविश्वास
नागरिकांच्या चर्चेत चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यावर अविश्वास दाखविला जात आहे. हे दोन्ही नेते बेभरवशाचे असून, यांच्या जिवावर सरकार स्थापन करणे घातकी ठरू शकते. त्यामुळे भाजपने देशातील १८ अपक्ष खासदारांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असाही चर्चेतील सूर आहे. जम्मू काश्मीरमध्ये दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांचा अपक्ष उमेदवारांनी पराभव केला, त्यांना भाजपने सोबत घ्यावे, अशीही चर्चा रंगत आहे.
हेही वाचा-