सत्यजित तांबेंविरोधात शुभांगी पाटलांना ‘मविआ’ देणार बळ ; आज नाशिकला महत्त्वाची बैठक

शुभांगी पाटील, सत्यजीत तांबे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शुभांगी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांना बळ देण्यासाठी गुरुवारी (दि.१९) नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीसाठी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई व खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत.

शिवसेनेने शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर नाशिकमध्ये महाविकास आघाडीची होणारी ही पहिलीच बैठक असेल. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या दृष्टीने नाशिक हे प्रमुख केंद्र असून, त्याकडे सर्वांच्याच नजरा वळल्या आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसकडून सुधीर तांबे यांनी व्टिस्ट घडवून आणत सर्वांनाच संभ्रमात पाडले. त्यांच्या जागी मुलगा सत्यजित तांबे यांनाच त्यांनी चाल दिली. त्यामुळे काँग्रेससह मित्रपक्षांमध्ये खळबळ उडाली होती. पक्षाचा एबी फॉर्म घेऊनही सत्यजित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेसने डॉ. पिता-पुत्रांना निलंबित केले आहे. भाजपकडून इच्छुक असलेल्या शुभांगी पाटील यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेत ठाकरे गटाचा पाठिंबा मिळविला. पर्यायाने आता त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही पाठिंबा मिळाल्यात जमा झाला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यासाठीच नाशिकमध्ये होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

हेही वाचा :

The post सत्यजित तांबेंविरोधात शुभांगी पाटलांना 'मविआ' देणार बळ ; आज नाशिकला महत्त्वाची बैठक appeared first on पुढारी.