‘समज’ देताच मोबाइल केला परत, समुपदेशनाने चोराचे हृदयपरिवर्तन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा‘- मोबाइल चोरीचा गुन्हा दाखल झाल्यास भविष्यात किती नुकसान होईल?, चोरी करणे चुकीचे आहे’ असा सल्ला पोलिसांनी दिल्यानंतर चोराने चोरलेला मोबाइल स्वच्छतागृहात ठेवला. त्यामुळे संबंधिताने पोलिसांची ‘समज’ गांभीर्याने घेतल्याने तो पोलिसांच्या रेकॉर्डवर येण्यापासून वाचला. पोलिसांच्या समुपदेशनाने चोराने स्वत:हून मोबाइल पुन्हा परत केल्याने मोबाइलधारक विद्यार्थिनीसही दिलासा मिळाला.

आधी पोलिसांनी आवाहन केले…

खासगी कोचिंग क्लासमध्ये एका विद्यार्थिनीच्या बॅगेतून अज्ञात व्यक्तीने मोबाइल काढला होता. विद्यार्थिनीने सर्वत्र शोध घेतला. तिने पालकांना ही बाब सांगितली व पालकांसह ती सरकारवाडा पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार नीलेश वायकंडे, नीलम चव्हाण, संदीप सोनावणे यांचे पथक क्लासमध्ये गेले. क्लास संचालक, शिक्षिकांना विश्वासात घेत वर्गात पोलिसांचे पथक गेले. ‘वर्गातील दोनशे विद्यार्थ्यांपैकीच कोणीतरी मोबाइल घेतल्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात आमच्याकडे माहिती आहे. जर, मोबाइल चोरला असेल, तर गुन्हा दाखल झाल्यास भविष्यात गंभीर परिणाम होतात, त्यामुळे संबंधिताने मोबाइल परत द्यावा’ असे आवाहन पोलिसांनी केले.

स्वच्छतागृहात मिळाला मोबाइल …

त्यानंतर गुन्हे शोध पथकाचे पोलिस निरीक्षक सुरेखा पाटील, उपनिरीक्षक भटू पाटील यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाइल क्लासच्या स्वच्छतागृहात आढळून आला. त्यामुळे पोलिसांच्या सल्ल्यानुसार अज्ञात विद्यार्थ्याने क्लासच्या स्वच्छतागृहात विद्यार्थिनीचा मोबाइल ठेवल्याचे उघड झाले. पोलिसांनी मोबाइल ताब्यात घेत विद्यार्थिनीकडे सोपवला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोबाइल परत मिळाला तर एक विद्यार्थीदेखील गुन्हा करण्यापासून परावृत्त झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला. संबंधित विद्यार्थिनी व पालकांनी चोरीची फिर्याद न देण्याचा निर्णय  घेतला. 

हेही वाचा :

The post 'समज' देताच मोबाइल केला परत, समुपदेशनाने चोराचे हृदयपरिवर्तन appeared first on पुढारी.