‘साधुग्राम’वर राष्ट्रीय युवक महोत्सव

गिरीश महाजन ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी पंचवटीमधील साधुग्रामची जागा अंतिम करण्यात आली आहे. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी (दि. २९) जागेची पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात तयारीचा आढावा घेतला. महोत्सवाच्या माध्यमातून नाशिकचे नाव देशपातळीवर पोहोचवावे, अशा सूचना महाजन यांनी केल्या.

नाशिकमध्ये १२ जानेवारीला राष्ट्रीय युवक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. चार दिवसीय या महोत्सवाचे उद‌्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. देशभरातून आठ हजारांहून अधिक युवक या महोत्सवात सहभागी हाेतील. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री महाजन यांनी साधुग्रामच्या जागेची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी बैठक घेतली. यावेळी युवक महोत्सवाच्या माध्यमातून देशभरात महाराष्ट्राचे नाव उंचावणार आहे. त्यामुळे महोत्सवाची तयारी करताना त्यामध्ये कोणतीही कमतरता भासणार नाही, याची काळजी घ्यावी. देशभरातून येणाऱ्या युवकांच्या निवास, भोजन व वाहतुकीसाठी सूक्ष्म नियोजन करावे. महोत्सवाच्या ठिकाणी पुस्तकांचे स्टाॅल उभारावे, असे निर्देश मंत्री महाजन यांनी दिले.

देशभरातून महोत्सवात युवक सहभागी होणार आहेत. नाशिक व महाराष्ट्राचे ब्रॅन्डिंगसाठी ‘एमटीडीसी’द्वारे युवकांना कॉफी टेबल बुक उपलब्ध कररून देण्यात येईल, असे महाजन यांनी सांगितले. यावेळी आमदार राहुल ढिकले व सीमा हिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, भाजप नेते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर, मनपाच्या माजी स्थायी समिती सभापती हिमगाैरी आडके यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

समारोपाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

नाशिकमध्ये १२ ते १६ जानेवारी या काळात राष्ट्रीय युवा महोत्सव हाेणार आहे. साधुग्राम येथील मैदानावर पंतप्रधान मोदी महोत्सवाचे उद‌्घाटन करतील. तर समारोपाचा कार्यक्रम पंचवटीमधील विभागीय क्रीडा संकुलात घेण्याबाबत चाचपणी सुरू आहे. समारोपाच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील.

आयुक्तांची कानउघाडणी

मंत्री महाजन यांच्या दौऱ्यावेळी साधुग्रामची पाहणी तसेच बैठकीला विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे अनुपस्थित होते. महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीतून गमे यांच्याशी संपर्क साधत त्यांची कानउघाडणी केली. त्यावर दौऱ्याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे गमेंनी स्पष्ट केले. त्यावर महाजन यांनी महोत्सवाला पंतप्रधान उपस्थित राहणार असून, देशभरातील हजारो युवक सहभागी होतील. तेव्हा महोत्सवात लक्ष घालत सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश महाजन यांनी गमेंना दिले.

हेही वाचा :

The post 'साधुग्राम'वर राष्ट्रीय युवक महोत्सव appeared first on पुढारी.