नाशिक : खंडणी घेणाऱ्या माय-लेकरासह तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ

खंडणी प्रकरण नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या विश्वस्तास धमकावून १० लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या तिघांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे या गुन्ह्यात अटक असलेल्या सारिका बापूराव सोनवणे (४२) व मोहित बापूराव सोनवणे (२४, दोघे रा. पाथर्डी फाटा), विनोद सयाजी चव्हाण (४१, रा. ता. देवळा) यांना शुक्रवारपर्यंत (दि. २४) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कृषी सहायक अधिकारी असलेल्या संशयित सारिका सोनवणे, मोहित सोनवणे व सारिकाचा भाऊ विनोद चव्हाण यांनी अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ न्यासाच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य निंबा मोतीराम शिरसाट (५४, मूळ रा. देवळा) यांना गंगापूर रोड येथे बोलावले होते. संशयितांनी शिरसाट यांना आक्षेपार्ह मॉर्फ व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच शिरसाट यांना आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून २० कोटी रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून शिरसाट यांनी सारिकास नोव्हेंबर २०२३ मध्ये ५० लाख रुपये दिले.

याआधीही शिरसाट यांनी मदत म्हणून सारिकाला ४५ लाख रुपये दिले होते. नोव्हेंबरमध्ये सारिकाने पुन्हा साडेदहा कोटी रुपयांची मागितले. वारंवार पैशांची मागणी होत असल्याने शिरसाट यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सापळा रचून मोहित सोनवणे यास शनिवारी (दि. १८) जेहान सर्कल येथे १० लाख रुपयांची खंडणी घेताना पकडले. मोहित व सारिका यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. सखोल तपाासात संशयितांच्या घरातून १९ लाख रुपयांची रोकड जप्त केली. तसेच शिरसाट यांच्याकडे खंडणी मागताना, आर्थिक व्यवहार करताना सारिकाचा भाऊ विनोद याचा सहभाग उघड झाल्याने त्यालाही अटक केली. विनोदच्या घरी ८ लाख ५० हजार रुपयांची रोकड व ५ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. दरम्यान, तिघांच्या पोलिस कोठडीची मंगळवारी (दि.२१) मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांच्या पोलिस कोठडीत शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

व्हिडिओच्या अहवालास प्रतीक्षा

सारिका हिने ज्या व्हिडिओवरून शिरसाट यांना धमकावले आहे त्या व्हिडिओची शहानिशा पोलिस करणार आहेत. त्यासाठी बुधवारी संबंधित व्हिडिओ तपासणीसाठी लॅबला पाठवण्यात येणार आहे. मात्र, त्याचा अहवाल येण्यासाठी तीन ते सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिक : खंडणी घेणाऱ्या माय-लेकरासह तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ appeared first on पुढारी.