नाशिक : पुढारी वृत्तसेवा – कलाकार म्हणून कमीजास्त झाले तरी चालेल. परंतु आई-वडिलांच्या नावाला काळिमा लागेल, आमची मान शरमेने खाली जाईल असे कधीही वागू नकोस असा संस्कार आईने दिला, तो आज मी आई झाल्यानंतरही पाळत आहे. आईची शिकवण, संस्कार, त्याग ही खूप मोठी शिदोरी आहे. तिचे संस्कार, यशापासून अपघातातही प्रोत्साहन आणि पाठिंबा यामुळे मी मालिका, अभिनय, नृत्य क्षेत्रांत घडत गेले, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेत्री सुकन्या मोने-कुलकर्णी यांनी केले.
‘पुढारी’ आयोजित मातृदिन सोहळ्यात विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून अभिनेत्री सुकन्या मोने-कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत झाली. त्यावेळी त्यांनी आपला प्रवास उलगडून सांगितला. निर्मिती डव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित आणि किशोरी किणीकर यांनी संवाद साधला.
‘कुसुम मनोहर लेले’च्या आठवणी
भूमिकेचा अभ्यास मी कधी केलाच नाही. नाटकाच्या तालमीतून वाचन करताना प्रत्येक ओळीतून ती समजत जाते. तालमीतून भूमिकेत जसजसे रुळत जातो तसतसे त्यात कलावंत म्हणून भूमिकेत जसजसे रुळत जातो तसतसे त्यात कलावंत म्हणून आपण समरस होत जातो. कुसुम मनोहर लेले’चे प्रयोग करत गेल्यानंतर कुसुम समजत गेली. अनेक ठिकाणी सुजाता भेटत गेली. ‘कुसुम मनोहर लेले’च्या १० प्रयोगांनंतर या विषयावर परिसंवाद घेत गेलो. त्यानंतर अनेक महिला माझ्या समोर येत गेल्या, ज्या अशाच परिस्थितीतून गेल्या होत्या, नवरा मुलगा बघताना त्याबद्दल चौकशी करून त्याचा पूर्वेतिहास, चारित्र्य पाहूनच मग त्याला आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडा. नवऱ्यावरही डोळस प्रेम करा हा संदेश ‘कुसुम मनोहर लेले’ नाटकाने दिला, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
अभिनय अन् अपघात
‘जन्मघाट’ नाटकाच्या पुण्यातील प्रयोगाच्या वेळी अभिनय करत असताना सुकन्या यांचे डोके स्टेजवर आदळले. कवटी, मेंदू यातील भागात रक्त साकळले आणि त्या आजारी पडल्या होत्या. नंतर चित्रपटाचा सेट अंगावर कोसळूनही त्या जखमी झाल्या होत्या. त्यात त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. याबद्दल सुकन्या सांगतात, आईचे प्रोत्साहन, साथ आणि जिद्दीने मी पुन्हा उभी राहिले. आईने त्यावेळी ट्रीटमेंट म्हणून थिएटर्स, नाट्यगृहात नेऊन माझ्यावर उपचार केले, असे सुकन्या कुलकर्णी यांनी सांगितले.
५० व्या वर्षी अरंगेत्रम् अन् नृत्याची झलक
अपघातानंतर सुकन्या यांचा पाय २८ वर्षे वाकत नव्हता. त्यांनी कुणालाही न सांगता नृत्य सराव, अभिनयही सुरू ठेवला. प्राजक्त देशमुख यांच्याकडून त्यांनी नृत्यनाटिका लिहून घेतली. त्यामध्ये ‘वैजयंती’ ही नाटिका सादर केली आणि अरंगेत्रमचे स्वप्न ५० व्या वर्षी पूर्ण झाले, असे सांगून सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी अत्यंत सुंदर नृत्यनाटिका सादर केली.
जगण्याला हवे आध्यात्मिक अधिष्ठान
जगण्याला अध्यात्माचे भक्कम अधिष्ठान हवे असे सांगून कुलकर्णी म्हणाल्या, मन शांत, स्थिर ठेवण्यासाठी प्रत्येकाने निदान २० मिनिटे ध्यानधारणा, अंतर्मुमुख होऊन, शांत बसून, आत्मपरीक्षण करावे, त्याने जीवन संतुलित होते, असे त्या म्हणाल्या. नव्या पिढीने अभिनय, सिनेमा, नाटक या क्षेत्रांत येण्यापूर्वी त्याचे शाखशुद्ध शिक्षण घेऊनच या क्षेत्रात प्रवेश करावा असा सल्ला कुलकर्णी यांनी दिला. अभिनयच नव्हे, तर सेट डिझाइन, प्रकाशयोजना, मेकअप, आदी क्षेत्रातही विपुल संधी आहेत, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
आईचे प्रोत्साहन, शाळेतील संस्कार
अभिनय, सिनेमा, मालिका या क्षेत्रांत घराण्यातील कुणीही नव्हते. आई-वडील कर्मशिअल आर्टिस्ट. आईला बालपणी वाटे की, सीमा देव, सुलोचना यांसारखे मुलीनेही अभिनय क्षेत्रात जावे. मात्र मला शिक्षिका व्हावे असे वाटे नंतर मी बँकेत नोकरी करून उर्वरित वेळ नृत्य अकॅडमीतून कलाकार घडवावे असे वाटे. अभिनय, सिनेमा, टीव्ही मालिका या क्षेत्रांत वळेल असे कधीही वाटले नाही. ‘आविष्कार’मध्ये नाटकासाठी मुली हव्या आहेत अशी जाहिरात वाचली. नाटकासाठी माझी निवड झाली. तिथून नाटके, अभिनय याची गट्टी जमली, असे कुलकर्णी यांनी सांगितले.