स्वाईन फ्लू’मुळे नाशिकमध्ये आणखी दोघांचा मृत्यू

स्वाईन फ्लू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- स्वाईन फ्लूमुळे नाशिकमध्ये आणखी दोघांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये शहरातील ५० वर्षीय पुरूष तर दिंडोरीतील ४२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. यामुळे नाशिकमधील स्वाईन फ्लू बळींची संख्या आठवर गेली आहे. आतापर्यंत शहरातील २८ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. या आजाराचा वाढता प्रादुर्भाव जीवघेणा ठरू लागल्याने महापालिकेचा वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला आहे.

नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव कोरोनाच्या कटू आठवणींना उजाळा देणारा ठरला आहे. उन्हाच्या कडाक्यातही या आजाराचा वाढता प्रादुर्भाव चिंताजनक आहे. नाशिकमध्ये जानेवारीत स्वाईन फ्लूची ‘एन्ट्री’ झाली. तापमान वाढल्यास स्वाईन फ्लू सारख्या आजारावर निसर्गत: नियंत्रण येते. परंतू यंदाच्या उन्हाळ्यात मात्र स्वाईन फ्लूने कहर केला. एप्रिल आणि मे महिन्यात कडक उन्हातही या आजाराचा लागण वेगाने होत गेली. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात शहरात स्वाईन फ्लूचे २३ बाधित रुग्ण आढळून आले होते. एप्रिलमध्ये जेलरोड येथील ५९ वर्षीय डॉक्टरचा या आजारामुळे मृत्यू झाल्याने या आजाराचे गांभीर्य वाढले. त्यानंतर मे महिन्यात सिन्नर मधील दातली गाव येथील एका ६३ वर्षीय महिला, मालेगाव येथील ६५ वर्षीय व्यक्ती तसेच २९वर्षीय महिला, निफाड येथील ६८ वर्षीय महिला, कोपरगाव येथील ६५ वर्षीय महिलेचा नाशिकमध्ये उपचारा दरम्यान मृत्यु झाला होता. गेल्या आठवड्यात नाशिकमधील जेलरोड भागातील ५८ वर्षीय सेवानिवृत्त एअरफोर्स कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मृत्यूनंतर रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दिंडोरीतील ४२ वर्षीय महिलेला स्वाईन फ्लूची लागण झाल्याने नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचे निधन झाले.

अशी आहेत स्वाईन फ्लूची लक्षणे

  • थंडी
  • ताप
  • सर्दी
  • खोकला
  • घसादुखी
  • अंगदुखी
  • पोटदुखी
  • मळमळ
  • उलटी
  • जुलाब आदी या आजाराची लक्षणे आहेत.

नाशिक शहरातील २८ जणांना स्वाईन फ्लूची बाधा झाली आहे. या सर्व बाधितांवर उपचार करण्यात आले आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचा दावा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केला आहे. ग्रामीण भागात आढळलेले रुग्ण शहरी भागात उपचार घेत असल्याने त्यासंदर्भातील माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला प्राप्त झाली आहे. शहरात या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या माध्यमातून उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यास तात्काळ रुग्णालयात उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अशी घ्या काळजी

स्वाईन फ्लू टाळण्यासाठी वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवावेत. पौष्टिक आहार घ्या. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री व हिरव्या पालेभाज्या या सारख्या पदार्थांचा आहारात वापर करावा. धुम्रपान टाळा. पुरेशी झोप व विश्रांती घ्या. रुग्णांनी मास्क वापरावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार घेऊ नये.

शहरात स्वाईन फ्लूची स्थिती नियंत्रणात असून घाबरण्यासारखे काही नाही. स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय विभागासोबत संपर्क करावा. डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक

हेही वाचा –