नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पोलिस खातेअंतर्गत परीक्षा उत्तीर्ण होत पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी घालणारे २५१ अधिकारी पोलिस दलात बुधवारी (दि. १७) सहभागी झाले. महाराष्ट्र पोलिस अकादमीत झालेल्या दीक्षान्त सोहळ्यात १२३ व्या तुकडीतून २४६ पुरुष व पाच महिला असे एकूण २५१ जणांनी अधिकारीपदाला गवसणी घातली. सलमान जाहेर शेख यांना यंदाची मानाची रिव्हॉल्व्हर भेटली.
शहरातील महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांच्या १२३ व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा झाला. याप्रसंगी राज्याचे माजी पोलिस महासंचालक व मानवी हक्क आयोगाचे सदस्य संजय कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण घेत प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक पोलिस दलात सहभागी झाले. यावेळी अकादमीचे संचालक राजेशकुमार यांनी अहवालवाचन केले. तसेच प्रशिक्षणार्थींनी दिमाखदार संचलन करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना मानवंदना देत कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी होण्याची शपथ घेतली. संचलनावेळी नाशिक शहर, ग्रामीण आणि राज्य राखीव पोलिस दल क्र. ७ धुळे या तीन बँड पथकांनी सलामी दिली.
शेख ठरले रिव्हॉल्व्हर चिन्हाचे मानकरी
सर्वोच्च मानाची रिव्हॉल्व्हर तसेच स्व. यशवंतराव चव्हाण सुवर्ण चषकाचे मानकरी अष्टपैलू कामगिरी करणारे परेड कमांडर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सलमान शेख हे ठरले. तसेच संतोष कोळगे (बेस्ट ड्रील), अंकुश दुधाळ (बेस्ट लॉ व सिल्व्हर बॅटन), रामचंद्र बहुरे (बेस्ट शूटिंग), नीलेश तळेकर (बेस्ट आउटडोअर), दीपक रहाणे (दुसरे उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी), मीना झाडे (उत्कृष्ट अष्टपैलू महिला).
सरासरी ३६ वयाची तुकडी
या तुकडीत मराठवाडा येथील ४५, पश्चिम महाराष्ट्रातील ७४, कोकणातील ५१, विदर्भतील ४९ आणि उत्तर महाराष्ट्रमधील ३२ प्रशिक्षणार्थींचा समावेश होता. तसेच या तुकडीतील पोलिसांचे वय २५ ते ४७ वर्षातील असल्याने सरासरी ३६ वयाची ही तुकडी होती. तुकडीतील २०८ अधिकारी पदवीधर आहेत. तसेच १३ उपनिरीक्षकांना पोलिस शिपाई असताना गडचिरोली येथे विशेष सेवा पदक, चौघांना फोर्स वन विशेष सेवा पदक मिळाले आहेत.
स्वत:ला सुदृढ ठेवा
स्वत:ला शारीरिक-मानसिकदृष्ट्या सक्षम व सुदृढ ठेवण्याचा सतत प्रयत्न करा. कायदा व सुव्यवस्था राखताना स्वत:चुकणार नाही, याची दक्षता घ्यावी. भ्रष्टाचार व सायबर गुन्हेगारी ही समाजापुढील मोठी समस्या असून, त्याच्या निवारणासाठी प्रयत्न करा, असा सल्ला दीक्षान्त सोहळ्याचे प्रमुख पाहुणे माजी पोलिस महासंचालक संजय कुमार यांनी दिला.
प्रतिभावान तुकडी
गडचिरोलीतील आदित्य महावी यांनी २०२३ चा पोलिस महासंचालक पदक, राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक मिळवले. तसेच सुदर्शन बोडखे यांनी ऑल इंडिया शूटिंग स्पोर्ट्समध्ये रौप्यपदक पटकावले. संतोष शिंदे यांनी ऑल इंडिया कमांडो स्पर्धेत सुवर्णपदक, २ फोर्स वन विशेष पदक, ३ गडचिरोली विशेष सेवा पदक मिळवले आहे. मुन्ना देशमुख हे राष्ट्रीय कुस्तीपटू आहेत. नीलेश चाटे हे सायबर तज्ज्ञ असून, त्यांनी विविध २३१ पुरस्कार पटकावले. तर मन्सुर शहा यांनी अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात सुवर् पदक मिळवले.
पैठण तालुक्यातील आडूळचा मी रहिवासी आहे. बी.ए., डी.एडपर्यंत शिक्षण घेतले. वडील शेतकरी असून, सर्वसामान्य कुटुंबातून पोलिस शिपाई झालो. परंतु, अधिकारी होईल, हा शब्द कुटुंबीयांना दिला होता. त्यानुसार २०२२ मध्ये खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण झालो. गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठी सेवा बजावेल. – सलमान शेख, मानाची रिव्हॉल्व्हरचे मानकरी
बी.ए., डी. एडपर्यंत शिक्षण झाले. २०१४ मध्ये पोलिस दलात सहभागी व २०२१ला खातेअंतर्गत परीक्षा उत्तीर्ण झाले. माझे पती खात्यांतर्गत परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक झाले. त्यांच्यापासून प्रेरित होत मीदेखील खात्यांतर्गत परीक्षा दिली. यापूर्वी हिंगोली येथे पोलिस दलात सेवा बजावली आहे.
– मीना झाडे, सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी
हेही वाचा :
- उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’चे वलय घालवले : दादा भुसे यांची टीका
- श्री रामलल्लाचे अयोध्या नगरभ्रमण उत्साहात; महिलांची कलशयात्रा ठरली लक्षवेधी
- बालगंधर्व व्यवस्थित असताना कशासाठी पाडायचं? : सुषमा अंधारे यांचा सवाल
The post २५१ उपनिरीक्षक पोलिस दलात सहभागी appeared first on पुढारी.