अनधिकृत शाळा सहा महिन्यांपासून सुरुच, चांदशी-जलालपूर येथील प्रकार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- चांदशी-जलालपूर येथे असलेल्या श्री चैतन्य टेक्नो स्कूल अनधिकृत असल्याने ती बंद करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी दिल्यानंतरही शाळा सुरुच असल्याचे समोर आले आहे. याबाबत लवकरच कारवाई करणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी मिता चौधरी यांनी दिली.

जून महिण्यामध्ये जलालपूर-चांदशी या ठिकाणी असलेल्या श्री चैतन्य टेक्नो स्कूलला शासनाची कोणतीही परवानगी नसताना शाळा सुरु असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांच्या समोर आले होते. अनधिकृतपणे सुरु असलेली ही शाळा बंद करावी, तसेच या शाळेविरुध्द बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार फौजदारी गुन्हा दाखल करुन या शाळेविरुध्द एक लाख रुपये दंडाची शिक्षा करावी व या शाळेविरुध्द प्रतिदिन १० हजार रूपये इतक्या दंडाची शिक्षा करावी, अशा सूचना दिल्या होत्या. या सूचनांनंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळेला केवळ कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सद्यस्थितीत शाळा सुरु असल्याने तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य यामुळे धोक्यात येत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त होत आहे.

माध्यमिक शिक्षण विभागासमोर अनधिकृत शाळा सुरु असल्याबाबतची माहिती प्राप्त होताच पंचायत समितीमधील गटशिक्षणाधिकाऱ्यांना संबंधित शाळा बंद करुन गुन्हा नोंदविण्याच्या सूचना दिल्या आहेत. अद्याप त्यांच्याकडून काही कारवाई झाल्याचे पत्र कार्यालयास प्राप्त झालेले नाही. – प्रविण पाटील (शिक्षणाधिकारी, माध्यमिक)

शिक्षणाधिकाऱ्यांकडून सूचना मिळाल्यावर कारणे दाखवा नोटीस दिली होती. आता विस्तार अधिकारी यांना सूचना देऊन लवकरात लवकर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. – मिता चौधरी, गटशिक्षणाधिकारी

शाळा मान्यतेसाठीच्या कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. मान्यता मिळविण्यासाठी आ‌वश्यक बाबी पूर्णत्वास जाणार आहेत. सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. – योगेश निकम, व्यवसाय विकास व्यवस्थापक, श्री चैतन्य टेक्नो स्कूल, नाशिक

हेही वाचा 

The post अनधिकृत शाळा सहा महिन्यांपासून सुरुच, चांदशी-जलालपूर येथील प्रकार appeared first on पुढारी.