अ. भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलन : आशावाद हाच मुस्लीम मराठी साहित्याचा स्थायीभाव – अब्दुल कादर मुकादम

अ.भा. मुस्लिम मराठी साहित्य संमेलन www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तेसवा
नवीन पिढीतील मुस्लीम मराठी साहित्यिकांच्या लेखणीतून मुस्लीम समाजाची व्यथा, वेदना, निराशा मोठ्या प्रमाणात मांडली जाते. परंतु हे वास्तव मान्य केल्यानंतर आशावाद हाच मुस्लीम मराठी साहित्याचा स्थायीभाव असल्याचे जाणवत असल्याचे मत नवव्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन प्रा. फकररूद्दीन बेन्नूर नगरी, दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत व माजी राज्यसभा सदस्य हुसेन दलवाई, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, स्वागताध्यक्ष शेख इरफान रशीद, हसन मुजावर, फ. म. शहाजिंदे, जावेपाशा कुरेशी, डॉ. अलीम वकील, अय्युब नल्लामंदू, इमरान कुरेशी, डॉ. युसूफ बेन्नूर उपस्थित होते. सुरुवातीला संमेलनाचे उद्घाटन वृक्षास जलपान करून करण्यात आले. तसेच कासिद या साप्ताहिक विशेषाकांचे प्रकाशन करण्यात आले. मुकादम म्हणाले, ललित आणि वैचारिक लेखन करणार्‍या साहित्यात सूक्ष्म फरक असतो. ललित लेखक त्याला जे जाणवते तसे तो व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ते इतरांना समजेल रूचेल काय याबाबत उदासीनता आढळून येते. वैचारिक लेखन करणारा आजूबाजूला घडणार्‍या घटनांनी प्रभावित होऊन त्या समजून घेत साहित्यात त्या मांडत असतो. त्या पलीकडे जाऊन तो समाजात प्रबोधन आणि प्रबोधन घडून आणण्यासाठी प्रयत्नशील असतो, असे मत त्यांनी मांडले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शासनाने कोणतेही अनुदान देऊ नये. तिथे जत्रेपलीकडे काहीही होत नाही. तोच निधी शासनाने इतर साहित्य संमेलनाला द्यायला हवा, असे विचार ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक उत्तम कांबळे यांनी मांडले. डॉ. फारूक शेख यांनी प्रास्ताविक केले. शीतल भाटे, मंगेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

80 टक्के मुस्लीम समाज खितपत पडलेला
शिक्षण, नोकरी, राजकारण, आयआयटीसारख्या क्षेत्रात मुस्लीम दिसून येत नाही, ही शोकांतिका आहे. समाजात घडणार्‍या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यापेक्षा धार्मिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून दुर्लक्ष केले जाते. देशात केवळ तीन टक्के मुस्लीम पदवीधर असून, 80 टक्के समाज खितपत पडलेला आहे. लग्न कुणाशी करावे, दाढी कुणी वाढवावी, टोपी कुणी घालावी हे तीन टक्के लोक ठरवू शकत नाही. आपण आपल्या लोकांना कसे सांभाळून घेतो ते महत्त्वाचे असते. अभिव्यक्तीपेक्षा वास्तव साहित्यात यायला पाहिजे, असे विचार हुसेन दलवाई यांनी मांडले.

हेही वाचा:

The post अ. भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलन : आशावाद हाच मुस्लीम मराठी साहित्याचा स्थायीभाव - अब्दुल कादर मुकादम appeared first on पुढारी.