आज रक्षाबंधन, माहेरवाशिणींच्या गर्दीने बसस्थानके गजबजली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बहीण-भावातील नाते आणखी दृढ करणारा रक्षाबंधन सण सर्वत्र बुधवारी (दि.३०) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही माहेरवाशिणींनी माहेरी जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसला पसंती दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे मंगळवार (दि.२९)पासून माहेरवाशिणींच्या गर्दीने जुने सीबीएस, ठक्कर बाजार, महामार्ग, नाशिकरोड, निमाणी आदी बसस्थानके गजबजले आहेत. हीच परिस्थिती उद्याही बघावयास मिळणार आहे.

रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर माहेरवाशिणींची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन नाशिक विभागातून जादा बसेस सोडण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. दिवसभर एसटी महामंडळाच्या नियमित फेर्‍यांसह नाशिकहून धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि कसारा आदी मार्गांवर जादा बसेस रवाना झाल्या. प्रवाशांच्या मागणीनुसार बसेस उपलब्ध करून दिल्या जात होत्या. तरीही प्रवाशांची गर्दी दिवसभर कायम होती. मुंबई, नगर, सोलापूर, सातारा आदी भागांसाठी महामार्ग बसस्थानक, तर ठक्कर बाजार येथून खानदेश, औरंगाबाद, पुणे या मार्गावर जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. जुने सीबीएस बसस्थानकातून जिल्हाअंतर्गत मार्गावर लालपरी धावत आहे. दरम्यान सिन्नर, कसबेसुकणे, गिरणारे, ओझर, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, मखमलाबाद आदी मार्गांवर सिटीलिंकच्या बसेस ठराविक वेळेत धावत असल्याने माहेरवाशिणींना मोठा आधार मिळत आहे.

तिकिटासाठी प्रवाशांच्या रांगा

सटाणा, कळवण, मालेगाव या ग्रामीण भागांत प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पूर्ण क्षमतेने वाहतूक केली जात आहे. दिवसभरात जळगाव, धुळे, नंदुरबार आदी मार्गांवर जादा बसेस धावत आहेत. मात्र, माहेरी जाणाऱ्या महिलाची संख्या लक्षणीय असल्याने बसेस कमी पडत आहेत. विशेष म्हणजे धुळ्याच्या तिकिटासाठी बुकिंग काउंटरपासून ठक्कर बाजार बसस्थानकाबाहेरपर्यंत प्रवाशांची रांग लागली होती.

हेही वाचा :

The post आज रक्षाबंधन, माहेरवाशिणींच्या गर्दीने बसस्थानके गजबजली appeared first on पुढारी.