नाशिक : बारावी गुणपत्रिकेचे आजपासून वितरण

नाशिक : पुढारी वृृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 10 दिवसांपूर्वी ऑनलाइन जाहीर झाला. या विद्यार्थ्यांना सोमवारी (दि. ५) दुपारी 3 पासून गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यापूर्वी, एक दिवस आधीच महाविद्यालयांना गुणपत्रिका वितरीत करण्यात आल्या आहेत.

राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेचा निकाल २५ मे रोजी जाहीर झाला. नाशिक विभागीय मंडळाचा निकाल ९१.६६ टक्के लागला. या परीक्षेसाठी नाशिक विभागातील १ लाख ५९ हजार ९८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १ लाख ५९ हजार ००२ विद्यार्थ्यांनी २५६ केंद्रांमध्ये प्रत्यक्ष लेखी परीक्षा दिली. त्यापैकी तब्बल १ लाख ४५ हजार ७४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये ७९ हजार ७१९ मुलांचा, तर ६६ हजार ३० मुलींचा समावेश आहे. दरम्यान, बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना मूळ गुणपत्रिकांची प्रतीक्षा होती. शिक्षण मंडळाने ५ जूनपासून गुणपत्रिका वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी ४ जूनपूर्वी तालुकानिहाय गुणपत्रिकांचे वितरण केले जाईल. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयातर्फे प्राचार्यांना पत्र पाठविण्यात आले होते.

उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी १४ जूनपर्यंत मुदत
विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका छायाप्रती मागणीसाठी १४ जूनपर्यंत मुदत असणार आहे. ई-मेल / संकेतस्थळ, हस्तपोहोच तसेच रजिस्टर पोस्ट या पैकी एका पर्यायाची निवड करून मागणी नोंदविता येणार आहे. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी प्रतिविषय 400 रुपये शुल्क ऑनलाइन पद्धतीने अदा करावे लागणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : बारावी गुणपत्रिकेचे आजपासून वितरण appeared first on पुढारी.