आत्मविश्वास डगमगल्याने मुख्यमंत्री ज्योतिषाकडे : बाळासाहेब थोरातांची टीका

बाळासाहेब थोरात www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर तालुक्यातील मीरगाव येथील भेटीत ज्योतिष पाहण्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका टिपणी होत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही शिंदेंवर निशाना साधत टीका केली आहे. मी अशा प्रकारच्या हात पाहणारे आणि भविष्य पाहणाऱ्यांकडे गेलेलो नाही. आत्मविश्वास डगमगायला लागला की, असे उद्योग सुरू होत असल्याचा टोलाही थोरातांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

नाशिकमध्ये कृषीथॉन प्रदर्शनास ते आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निसर्गात कुठली तरी शक्ती असते. त्याला मी परमेश्वर मानतो आणि सर्वांचाच परमेश्वर एक आहे. मी कधीही अशा प्रकारच्या हात पाहणाऱ्याकडे अद्याप गेलेलो नाही. राजकारणात हात दाखवणे आणि हात वर करून दाखवणे यात फरक असल्याचे सांगत तुम्ही काम केले नाही तर जनता तुम्हाला हात दाखवत असल्याचे थोरात म्हणाले. सध्या तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवाईबाबतही त्यांनी टीका करत स्वायत्त संस्थांचा राजकारणासाठी उपयोग होत असल्याचा आरोप केला. हे आता सर्वसामान्यांनादेखील समजायला लागले आहे. दुर्दैवाने सत्तेचा उपयोग स्वार्थासाठी होत आहे. कुणी जास्त बोलला तर त्याला तपास यंत्रणांकडून दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगत थोरात यांनी संजय राऊत यांचे उदाहरण दिले.

कर्नाटकचा प्रश्न खूप जुना आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याविषयी खटला सुरू आहे. देशात अनेक प्रश्न आहेत. राहुल गांधी यांनी काढलेल्या पदयात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिकांचे लक्ष विचलित व्हावे, यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही बाळासाहेब थोरात यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांवर राज्यपाल आणि भाजपचे नेते बोलत असतात. कर्नाटकचे मंत्री महाराष्ट्रावर वक्तव्य करतात. हे सर्व ठरवून सुरू असल्याचे सांगत मतांसाठीच हे केले जात असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.

The post आत्मविश्वास डगमगल्याने मुख्यमंत्री ज्योतिषाकडे : बाळासाहेब थोरातांची टीका appeared first on पुढारी.