आ. कांदे : जलदगती न्यायालयात चालविणार खटला; लोकेश हत्याकांड प्रकरण

आमदार कांदे www.pudhari.news

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
लोकेश हत्याकांड प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा होईल, यासाठी आपण स्वत: पूर्ण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार सुहास कांदे यांनी लोकेशच्या पालकांचे सांत्वन करताना दिली. यावेळी त्यांच्या वतीने लोकेशच्या पालकांना एक लाख रुपये आणि चार महिन्यांचे रेशन आणि जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. शिवाय शासनाकडून 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे आमदार कांदे यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात नराधम राहुल पवार याने लोकेशवर अत्याचार करत त्याचा निर्घृण खून केला. या घटनेमुळे लोकेशच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांचे सांत्वन करण्यासाठी आमदार सुहास कांदे, अंजुम कांदे यांनी स्वत: भेट घेतली. आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक करून गजाआड केल्याबद्दल त्यांनी पोलिसांचे अभिनंदन केले. यावेळी अंजुम कांदे यांनी आपणदेखील एक माता असून, त्यामुळे तुमचे दुःख समजू शकते, अशा शब्दांत त्यांनी लोकेशच्या पालकांचे सांत्वन केले. याप्रसंगी तहसीलदार सिद्धार्थ मोरे, पोलिस उपअधीक्षक समीरसिंग साळवे, एपीआय प्रल्हाद गिते, मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल, बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, राजाभाऊ भाबड, जिल्हा उपप्रमुख सुनील हांडगे, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख उज्ज्वला खाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post आ. कांदे : जलदगती न्यायालयात चालविणार खटला; लोकेश हत्याकांड प्रकरण appeared first on पुढारी.