नाशिक : महापालिकेतील नोकरभरतीला वेग

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

वाढता आस्थापना खर्च लक्षात घेता अत्यावश्यक असलेलीच पदे भरण्याबाबत खातेप्रमुखांनी शिफारस करावी, असे स्पष्ट आदेश आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी सर्व खातेप्रमुखांना दिले आहेत. डिसेंबर २०२३ पर्यंत आस्थापना खर्च मर्यादा अट शिथिल असल्यामुळे ज्या पदाची बिंदू नामावली शासनाच्या मागासवर्ग कक्षाकडून तपासली गेली आहे, अशा पदांची पदभरती तातडीने करणे शक्य असल्यामुळे त्याबाबत तातडीने प्रक्रिया करावी, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

आयुक्त तथा प्रशासक डॉ. करंजकर यांनी नोकरभरतीच्या प्रक्रियेला गती दिली आहे. यासंदर्भात खातेप्रमुखांच्या बैठकीत आयुक्तांनी महापालिकेतील रिक्त पदांचा आढावा घेतला. यात सरळसेवेतील अनेक पदे भरली गेली नसल्याचे समोर आले. महापालिकेचा आकृतीबंध ‘क’ वर्गानुसार असून सुमारे ७०९२ पदे मंजूर असताना सद्यस्थितीत साडेचार हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जवळपास गेल्या २४ वर्षांपासून महापालिकेत नोकर भरती झालेली नसून, त्या मागचे प्रमुख कारण म्हणजे आस्थापना खर्च हा ३५ टक्के पेक्षा अधिक आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात ७५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरण्याबाबत घोषणा केल्यानंतर नाशिक महापालिकेलाही आस्थापना खर्च मर्यादेच्या अटीमधून शिथिलता मिळाली. मात्र नोकरभरती होऊ शकली नाही. आता ही मुदत डिसेंबर २०२३ ला संपुष्टात येत असून महापालिकेला त्यामुळे नोकरभरतीत अडचण येण्याची शक्यता आहे, ही बाब लक्षात घेत आयुक्त करंजकर यांनी आवश्यक असलेली कमीत कमी पदे भरण्याबाबत शिफारस करण्याच्या सूचना खातेप्रमुखांना दिल्या आहेत.

यामुळे रखडला सुधारित आकृतीबंध..

शासन निर्देशानुसार महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधासाठी अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फत पडताळणी झाल्यानंतर दहा विभागांच्या आकृतीबंधास आयुक्तांची मान्यता मिळून ते अंतिम झाले आहेत. ३० विभागांचे आकृतीबंध समितीवर ठेवून निर्णय घेणे अपेक्षित असून ९ विभागांकडून अद्यापही आकृतीबंधाचा मसुदा आलेला नाही. त्यामुळे संबंधित विभाग प्रमुखांनी दोन ते तीन दिवसांत ही कारवाई पूर्ण करावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

मानधनावर भरतीसाठी हालचाली

दरम्यान एकीकडे सरळसेवेने भरती प्रक्रिया राबविताना मानधनावर कर्मचारी भरण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात संबंधित विभागांनी प्रशासन विभागामार्फत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. नोकर भरतीसाठी प्रशासनामार्फत वेगाने प्रयत्न सुरू झाले असून पदभरती करता आवश्यक आयआरडी फॉर्म भरून विभाग प्रमुखांनी आपली स्वाक्षरी करून दोन ते तीन दिवसांत सामान्य प्रशासन शाखेत सादर करावा, असेही आदेश दिले आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : महापालिकेतील नोकरभरतीला वेग appeared first on पुढारी.