इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या लाल यादीत या पक्षाचाच समावेश

ग्रीन पिजन pudhari.news

नाशिक : आनंद बोरा

मध्य प्रदेशातील बांधवगडचे जंगल वाघाच्या अधिवासासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. मात्र, आता या जंगलात दुर्मीळ समजला जाणारा ‘अ‍ॅशी-हेडेड ग्रीन पिजन’ हा दुर्मीळ पक्षी वास्तव्यास आला आहे. गेल्या ४ ते ७ जानेवारीदरम्यान या जंगलात करण्यात आलेल्या पहिल्या पक्षीगणनेत ही बाब पुढे आली आहे. मध्य प्रदेशातील वनविभाग आणि डब्ल्यूएनसी यांनी आयोजित केलेल्या या पक्षीगणनेसाठी देशभरातील ९० पेक्षा अधिक पक्षी अभ्यासक सहभागी झाले होते.

बांधवगड या अभयारण्यात तब्बल २४८ जातींचे पक्षी वास्तव्यास असल्याचे निरीक्षण पक्षी अभ्यासकांनी नोंदविले. त्यामध्ये ‘ॲशी-हेडेड ग्रीन पिजन’ (Green Pigeon) हा दुर्मीळ पक्षी याठिकाणी वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे हा पक्षी प्रथमच मध्य प्रदेशात दिसून आला आहे. ईशान्य भारत, बांगलादेश, नैऋत्य चीन, म्यानमार, थायलंड, लाओस आणि व्हिएतनाममध्येच हा पक्षी दिसून येतो. त्यामुळे तो बांधवगडच्या जंगलात आढळून आल्याने, पक्षी अभ्यासकांमध्येदेखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अ‍ॅशी-हेडेड ग्रीन पिजन (ट्रेरॉन फेरेई) हे ट्रेरॉन वंशातील कबूतर आहे. २०१४ मध्ये इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या लाल यादीत समाविष्ट या पक्षाचा समावेश करण्यात आला आहे. (Green Pigeon)

या पक्षाचे असे आहे वर्णन
राखाडी डोके असलेला हा हिरवा कबूतर सहसा एकट्याने किंवा लहान गटात आढळतो. त्याचे उड्डाण जलद आणि थेट आहे. तो विविध प्रकारच्या वनस्पतींच्या बिया आणि फळे खाताे. हा पक्षी झाडावर काडीचे घरटे बांधतो आणि दोन पांढरी अंडी घालतो. हे पक्षी बहुतांश वेळ झाडांवर घालवतात आणि सहसा ६ ते ८ पक्ष्यांच्या कळपांमध्ये आढळतात. हा पक्षी ‘हू-ओ-ओओ’सारखा आवाज करतो. हे पक्षी लांब पल्ल्याच्या स्थलांतरासाठी ओळखले जात नाहीत. तरीदेखील तो मध्य प्रदेशात कसा आला, याविषयी कुतुहूल व्यक्त केले जात आहे. या प‌क्ष्याची लांबी २५ सेमी असते. पाठ आणि पंख हिरवे असतात आणि पोटाखाली गुलाबी रंग असतो. त्यांना ओळखण्याचा एक मार्ग म्हणजे त्यांच्या फ्लाइट पॅटर्नद्वारे, ज्याचे वर्णन ‘बॅट-सारखे’ फडफडणे असे केले जाते. एका उड्डाणात सुमारे दोनशे ते तीनशे मीटर अंतर कापतात. पंखांचा विस्तार सुमारे ४० ते ४५ सेमी असतो. नर आणि मादीचे स्वरूप सारखेच असते, परंतु नर मादीपेक्षा किंचित मोठे असतात.

हॅरिअल पक्ष्याच्या कळपात ग्रीन पिजन
बांधवगड या अभयारण्यातील भद्रशीला तलावाजवळ पक्षी अभ्यासकांकडून पक्ष्यांचे निरीक्षण केले जात असताना मोहाच्या झाडावर आठ ते दहा हरिअल पक्षी बसलेले होते. त्यामध्ये एक रंगीबेरंगी पक्षी होता. त्याचे निरीक्षण केले असता, तो दुर्मिीळ ॲशी-हेडे ग्रीन पिजन (Green Pigeon) असल्याचे दिसून आले.

The post इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या लाल यादीत या पक्षाचाच समावेश appeared first on पुढारी.