कर्नाटकने महाराष्ट्राच्या संयमाचा अंत पाहू नये : भुजबळ यांचा इशारा

छगन भुजबळ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बेळगावात कन्नडी गुंडांनी महाराष्ट्राच्या गाड्यांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेध नोंदवत महाराष्ट्राच्या संयमाचा अंत पाहू नका आणि महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, असा सज्जड दम माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कर्नाटकला दिला.

कर्नाटक सरकार महाराष्ट्राची गावे घेण्याची घोषणा करत आणि महाराष्ट्रातील सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. महाराष्ट्र सरकारने आता भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी करतानाच केंद्र शासनानेदेखील यात हस्तक्षेप करून कर्नाटक सरकारला समज द्यावी, अशी मागणी भुजबळांनी केली आहे. प्रकरण कोर्टात असताना त्यास चिथावणी कोण देत आहे, याची माहितीदेखील घेतली गेली पाहिजे. कर्नाटकाने गुंडगिरी थांबवली नाही तर पुन्हा एकदा गनिमी कावा दाखवावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

इतर गावांची मागणी करणाऱ्या कर्नाटकने अगोदर महाराष्ट्राची बेळगाव, कारवार, बिदर, भालकी ही गावे महाराष्ट्राला द्या आणि नंतर कांगावा करा. ही दादागिरी आणि गुंडगिरी महाराष्ट्र खपवून घेणार नाही. मराठी माणसाला त्याचे उत्तर देता येत नाही, असे नाही. पण, महाराष्ट्राच्या संयमाचा अंत कर्नाटकने पाहू नये, असा इशारा त्यांनी दिला. बेळगावसह कर्नाटकातील मराठी माणसांसोबत आम्ही नेहमीच आहोत, असा विश्वासही भुजबळांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

The post कर्नाटकने महाराष्ट्राच्या संयमाचा अंत पाहू नये : भुजबळ यांचा इशारा appeared first on पुढारी.