कविता दिनविशेष : विचार, भावना, कल्पना शब्दात गुंफण्याची कला म्हणजे ‘कविता’

नाशिक : दीपिका वाघ

कविता लिहिण्यापेक्षा ती समजून घेण्यासाठी संयम असायला हवा. शब्दाला शब्द जोडला म्हणून कविता तयार होत नाही तर विचारशक्ती, कल्पना, भावना, अनुभव, घटनांना शब्दांमध्ये गुंफण्याची कला म्हणजे कविता. युनेस्को अर्थात संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने १९९९ पासून लेखक, कवी, प्रकाशक यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून २१ मार्च हा दिवस कविता दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. भारत सरकार, साहित्य अकादमी, संस्कृती मंत्रालय कवितादिनाचे आयोजन करत असते.

कविता मानवी भावनेला वाट मोकळी करून देण्याचे काम करते. माणसाच्या मनात विचार भावना साठून राहिल्या असत्या तर माणूस जिवंतपणी निर्जीव झाला असता. कोणत्याही प्रसंगाचे, घटनेचे, निसर्गाचे वर्णन करण्याचे सर्वाेत्तम माध्यम कविता असते. कविता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुक्त प्रकार आहे. कवितेचा मूळ उद्देश मानवी स्थितीचा शोध घेऊन शब्दांद्वारे भावनांना आमंत्रण देणे.

ऐश्वर्य पाटेकर
ऐश्वर्य पाटेकर

मातीवर पडलेले शेण जसे माती घेऊन उठत असते. तसा कवी अनुभव घेऊन उठत असतो. ते अनुभव कवितेतून प्रकट होतात. पण, आला अनुभव की लिही कविता असे होत नाही. त्या अनुभवात कविता दडलेली असावी ही प्रथम अट. एखादा अनुभव आला की मला तत्काळ नाही लिहिता येत. तो अनुभव, ती घटना, तो प्रसंग सहा दिवस, सहा महिने, सहा वर्षेही आत पडून राहतो. पुन्हा काही नवे अनुभव येऊन मिळतात. एकत्रित अनुभवाची कविता तयार होते. – ऐश्वर्य पाटेकर, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी.

संतोष वाटपाडे
संतोष वाटपाडे

मनातील विचार प्रवाहांना जेव्हा संवेदनशीलतेचा स्पर्श होतो तेव्हा आत्मिक लयीची निर्मिती होते. त्यामुळे आपल्या गद्यस्वरूप विचारांना जी गतिमानता येते तिला आवेग म्हणतात. कविता कोणत्याही विषयातली असली तरी तिच्या निर्मितीमागे अथवा जन्मामागे आत्मिक आवेगच असतो. या गतिमान व लयबध्द विचार प्रवाहांवर पुढे जाऊन संस्कार होतात आणि मग मुक्तछंद अथवा वृत्तबद्ध कविता अथवा गझल निर्मिती होते. – संतोष वाटपाडे, कवी.

विनायक अमृतकर
विनायक अमृतकर

सुख-दु:खाच्या प्रसंगात माणूस भारावलेला असतो. त्या क्षणी स्वतःशी केलेला संवाद केवळ शब्दांची जुळवाजुळव नसते, त्या भावना असतात. त्या भावना कागदावर उतरवून त्यांचे आठवणीत रूपांतर कवितेच्या माध्यमातून होत असते. कविता आपण पाहिलेल्या, अनुभवलेल्या क्षणाचे प्रतिबिंब असते. कविता सुचलेली नसते शब्द सुचलेले असतात. एकदा यमक जुळायला लागले की कागद भरायला वेळ लागत नाही. -विनायक अमृतकर, कवी.

हेही वाचा:

The post कविता दिनविशेष : विचार, भावना, कल्पना शब्दात गुंफण्याची कला म्हणजे 'कविता' appeared first on पुढारी.