कृषीथॉन – २०२२ : अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाशी सांगड घालण्यासाठी सज्ज!

krushithon www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचे माहितीपर स्टॉल्स, जाणकारांशी भेटी, चर्चासत्राच्या माध्यमातून समस्यांचे निराकारण, पिकांची मार्केटिंग, प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव करणारे व्यासपीठ म्हणून ओळखले जाणारे कृषीथॉन २०२२ हे प्रदर्शन मेगा इव्हेंट होण्यासाठी सज्ज झाले आहे. यंदा दि. २४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान ठक्कर डोम, एबीबी सर्कलजवळ कृषीथॉन प्रदर्शन होणार असल्याची माहिती आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली.

कृषीथॉन २०२२ ही प्रदर्शनाची १५ वी आवृत्ती आहे. कृषीथॉनमध्ये यंदा कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय-भारत सरकार, राज्य शासनाचा कृषी विभाग यांच्यासह विविध शासकीय संस्थांचा सहभाग असेल. त्याशिवाय ॲग्रो इनपुट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया, नाशिक ॲग्रोडिलर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य नर्सरी संघटना यांचे सहकार्य लाभले आहे. यंदा सहभागी संस्था, कंपन्या आणि शेतकरी यांच्यात उत्साह दिसत असल्याचे सहआयोजक साहिल न्याहारकर यांनी सांगितले. कृषी क्षेत्राला अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी कृषीथॉनमध्ये विविध श्रेणीत कार्य करणाऱ्या कर्तबगारांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये ‘प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार’ (पुरुष गट), ‘प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार’ (महिला गट), ‘प्रयोगशील युवा कृषी उद्योजक पुरस्कार’, ‘प्रयोगशील युवा संशोधक पुरस्कार’, ‘प्रयोगशील कृषी विस्तार कार्य’, ‘आदर्श जलसंवर्धक गाव’, गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार या पुरस्काराचा समावेशआहे. कृषीथॉनमध्ये यंदा बोल भिडू…कृषीथॉन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या विविधांवर चर्चा घडवून आणण्यासाठी ‘प्रश्न शेतकऱ्यांचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये द्राक्ष, कांदा, टोमॅटो, डाळिंब उत्पादक आणि दुग्ध व्यावसायिकांच्या प्रश्नावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी www.krishithon.com या संकेतस्थळावर किंवा ०२५३-२९०७०१२१/२/३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तीनशेहून अधिक कंपन्यांचा सहभाग….

कृषीथॉनमध्ये यंदा तीनशेहून अधिक नामांकित कंपन्या आणि संस्था प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. तसेच कृषी निविष्ठा उत्पादक, बियाणे, अवजारे, ट्रॅक्‍टर, ठिबक व तुषार सिंचन, फवारणी यंत्रे उत्पादक कंपन्या, बँका, विमा कंपन्या, कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे, विविध कृषिपूरक उद्योग, नर्सरी, अन्नप्रक्रिया उद्योग तसेच कृषीविषयक शासकीय विभागांचा प्रदर्शनात सहभाग असेल.

हेही वाचा:

The post कृषीथॉन - २०२२ : अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाशी सांगड घालण्यासाठी सज्ज! appeared first on पुढारी.