Nashik : फार्मसी प्रवेशाला सुरुवात; २० जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी

फार्मसी प्रवेश प्रक्रिया,

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

औषधनिर्माणशास्त्र पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रिभूत प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक सीईटी सेलकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २० जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. तर २३ जुलैला प्रारूप गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. फार्मसी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (D Pharmacy Admission)

एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांत अभियांत्रिकीसह इतर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्या. मात्र, फार्मसी आणि आर्किटेक्चरची प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा कायम होती. त्यातूनच विद्यार्थी व पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. विलंब होत असल्याने विविध तर्कवितर्क लढविले जात होते. अखेर सेलकडून फार्मसी प्रवेशप्रक्रियेतील तीन फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

सीईटी सेलच्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना २० जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत. तर २१ तारखेपर्यंत कागदपत्रांनी पडताळणी करावी लागणार आहे. २३ जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार असून, या यादीवर २६ जुलैपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत. २८ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. दरम्यान, जात पडताळणी प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र, आर्थिक मागास प्रवर्ग आदी मूळ कागदपत्रे नसल्यास संबंधित विद्यार्थ्यांना पावती द्यावी लागणार आहे. अन्यथा या विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश दिले जातील, असे सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

असे आहे वेळापत्रक

२० जुलैपर्यंत – ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रे अपलोड

२१ जुलैपर्यंत- कागदपत्रांची पडताळणी

२३ जुलै : तात्पुरती गुणवत्ता यादी

२४ ते २६ जुलै – हरकती नोंदविणे

२८ जुलै- अंतिम गुणवत्ता यादी

२९ ते ३१ जुलै- पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविणे

२ ऑगस्ट- तात्पुरती निवड यादी

३ ते ५ऑगस्ट- ऑनलाइन महाविद्यालय निश्चित करणे किंवा नाकारणे, तसेच प्रवेश निश्चिती

हेही वाचा : 

The post Nashik : फार्मसी प्रवेशाला सुरुवात; २० जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी appeared first on पुढारी.