कॅन्सर सर्व्हायव्हर नमिता कोहोक यांच्या जिद्दीला सलाम

नमिता कोहक www.pudhari.news

नाशिक (निमित्त) – दीपिका वाघ

कॅन्सर झाल्यानंतर डॉक्टरांनी 40 दिवस सक्तीची विश्रांती सांगितली होती. शस्त्रक्रिया झाली, मात्र स्पर्धेसाठी तयारी सुरू करायची होती. दररोज 16 गोळ्या सुरू आहेत, तरीही व्यायाम कधी चुकवला नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम सुरूच ठेवला. व्यायामासाठी अडीच तास राखूनच ठेवलेला आहे. सकाळी नाही जमलं तर सायंकाळी का होईना व्यायाम करतेच. बाटलीमध्ये रेती भरून ते डंबेल्स म्हणून वापरले. पण, जिद्द सोडली नाही. अखेर तीन महिन्यांनंतर स्पर्धा झाली आणि त्यात सुवर्णपदक मिळवले. गेल्या आठ वर्षांपासून कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढणार्‍या डॉ. नमिता परितोष कोहोक यांची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. दै. ‘पुढारी’ला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी त्यांनी विविध विषयांवर चर्चा करीत कॅन्सरनंतर आलेले अनुभव आणि काही प्रसंग उलगडून सांगितले.

यावेळी नमिता कोहोक म्हणाल्या की, गेल्या चार वर्षांपासून मी पॉवर लिफ्टिंग शिकतेय. सुवर्णपदक मिळाले तेव्हा केलेल्या कष्टाची जाणीव होते. ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी स्वार्थ हा असावाच लागतो. तिथे कारण देऊन चालत नाही. गेल्या आठ वर्षांपासून कॅन्सरच्या गोळ्या सुरू आहेत. रोजच्या 16 गोळ्या घेते तरी व्यायाम कधीही चुकवत नाही. रोज त्यासाठी अडीच तास ठरलेला असतो. सकाळी नाही जमले तर संध्याकाळी करते, पण व्यायाम कधीही चुकवत नाही. व्यायामामुळे जो फ्रेशनेस जाणवतो. बॉडीमध्ये तो दिवसभर कायम असतो. मन ताब्यात राहते. मन कधी भरकटत नाही. कधी डिप्रेशनला जवळ येऊ दिले नाही. कॅन्सर झाल्यानंतर 40 दिवस सक्तीची विश्रांती सांगितली होती. ऑपरेशन झाले तरी स्पर्धेसाठी तयारी सुरू करायची होती. डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम सुरूच होता. तीन महिन्यांनी नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धा झाली. त्यात सुवर्णपदक मिळाले. हे सलग चौथे सुवर्णपदक आहे.

माझ्याविरुद्ध मीच…
माझी कुणाशी स्पर्धा नाही. माझ्याविरुद्ध मीच आहे. त्यामुळे माझे ध्येय कधीही भरकटत नाही. केमोथेरपीनंतर आयुष्यात निरुत्साह आला होता. फारसे कशातही मन लागत नव्हते. तेव्हा जाणवले आयुष्यात गुरू असणे गरजेचे आहे. माझे गुरू आशय रानडे यांनी त्यावेळी खूप मदत केली. त्यानंतर जिममध्ये जाण्यास सुरुवात केली. काही वेगळे करता येईल का म्हणून गुगल केल्यावर पहिले वेट लिफ्टिंगचा पर्याय दिसला आणि तिथूनच त्याची आवड निर्माण झाली. डाएट करायचे म्हणजे ठरावीक पदार्थ खायचे, असे नाही तर सर्व खा पण मापात खा आणि व्यायाम करणे म्हणजे शरीर बॅलन्स ठेवणे गरजेचे आहे.

हेही वाचा:

The post कॅन्सर सर्व्हायव्हर नमिता कोहोक यांच्या जिद्दीला सलाम appeared first on पुढारी.