नाशिक : कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्ययंत्रणा सतर्क

कोरोना www.pudharinews

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चीनमधील वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सोमवारी (दि. 26) आरोग्य विभागाची बैठक घेत सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, प्रशासनाकडून मंगळवारी (दि.27) शासनाला जिल्ह्यातील कोविड तयारीचा अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली.

नाशिकमध्ये घाबरण्यासारखी परिस्थिती नसल्याने नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा. लसीकरण करून घ्यावे. मंगळवारी जिल्ह्यात मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. – गंगाथरन डी., जिल्हाधिकारी, नाशिक.

चीनमध्ये कोरोनाने थैमान घातले असून, केंद्र सरकारने देशातील जनतेला सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याच्या सूचनाही केंद्राने केल्या आहेत. खबरदारी म्हणून सरकारने राज्यांना ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर, औषधे आणि इतर आवश्यक तयारी करून ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी आरोग्य यंत्रणेची बैठक घेत जिल्ह्यातील स्थितीची माहिती घेतली. कोरोना लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सामान्य रुग्णालयाने तयारी पूर्ण केली आहे. मंगळवारी (दि.27) जिल्ह्यातील तयारीसंदर्भात केंद्राच्या पोर्टलवर माहिती अपलोड केली जाणार आहे. जिल्ह्यातील ऑक्सिजनपुरवठा, ऑक्सिजनसाठा, पीएसए प्लांट, लसीकरण आदींबाबत केंद्राला माहिती देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

सध्या आपल्याकडे दोन रुग्ण उपचार घेत आहेत. टेस्टिंगचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. सद्यस्थितीत 100 ते 150 नागरिकांचे टेस्टिंग करण्यात येत आहे. दुसर्‍या लाटेत महापालिकेने ज्या पद्धतीने आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून दिली होती, त्या धर्तीवर संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. – बापूसाहेब नागरगोजे, आरोग्य अधिकारी, नाशिक महापालिका.

हेही वाचा:

The post नाशिक : कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्ययंत्रणा सतर्क appeared first on पुढारी.