Nashik : तरुणांनो तयारीला लागा, पुढील महिन्यात मनपाची मेगा पदभरती

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथील महापालिकेच्या ११ विभागांच्या बहुप्रतिक्षित भरतीप्रक्रियेला अखेर पुढील महिन्यात प्रारंभ होणार आहे. अग्निशमन व आरोग्य विभागातील ७०४ पदांसोबतच इतर विभागांतील अडीच हजार रिक्तपदांच्या भरतीबाबत तांत्रिक पूर्तता करण्याचे काम सुरू असून, यासाठी चार आठवड्यांचा म्हणजेच साधारणत: एक महिन्याचा अवधी लागणार आहे. त्यामुळे आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून आॅनलाइन अर्ज मागविले जाण्याची शक्यता आहे.

महापालिकेतील ११ विभागांच्या सेवाप्रवेश नियमावलीच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिल्यानंतर मेगाभरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, भरतीप्रक्रिया राबविणाऱ्या एजन्सीवरून वादंग निर्माण झाल्याने ही सर्व प्रक्रिया ठप्प झाली होती. दरम्यान, राज्य शासनाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेमार्फतच भरती होणार असल्याचे स्पष्ट केल्याने भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेच्या आस्थापन परिशिष्टावर तब्बल सात हजार घ्यायची पदे मंजूर असून, त्यातील २,८०० पदे विविध कारणांमुळे रिक्त झाली आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे एकाच टेबलवर दोन ते तीन टेबलचे काम सुरू असल्याने, कामांना गती मिळत नसल्याचे चित्र आहे. शिवाय गेल्या २१ वर्षांपासून महापालिकेत नोकरभरतीच झालेली नसल्याने, मनपा प्रशासनही भरतीसाठी आग्रही आहे.

दरम्यान, पदभरतीबाबतचे सर्व वादंग निवळल्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून तांत्रिक बाजू पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या आॅनलाइन अर्ज प्रणालीत येणारे अडथळे दूर करण्यावर काम सुरू असून, यासाठी साधारणत: एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यासाठी ‘टीसीएस’कडून स्वतंत्र वेबसाइट तयार केली जाणार असून, ही वेबसाइट नाशिक महापालिकेच्या अधिकृत वेबसाइटला कनेक्ट केली जाणार आहे. त्यानंतर टीसीएसच्या माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवारांकडून अर्ज मागविले जाणार असल्याचे मनपा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आॅनलाइन अर्ज प्रणालीसाठीच्या तांत्रिक बाबींवर सध्या काम सुरू आहे. सर्व तांत्रिक बाबी विना अडथळे सक्षम झाल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवारांकडून आॅनलाइन अर्ज मागविले जाणार आहेत. आॅगस्टमध्ये ही प्रक्रिया सुरू होऊ शकते.

– लक्ष्मीकांत साताळकर, प्रशासन उपआयुक्त, मनपा

हेही वाचा : 

The post Nashik : तरुणांनो तयारीला लागा, पुढील महिन्यात मनपाची मेगा पदभरती appeared first on पुढारी.