नाशिक : शिंदे गटाच्या त्या माजी नगरसेवकांना १२ कोटींचे गिप्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून बाळासाहेबांची शिवसेना गटात सहभागी झालेल्या तेरा माजी नगरसेवकांना एकूण १२ कोटींच्या विकासकामांचे गिफ्ट शासनाकडून दिले जाणार आहे. यामुळे संबंधित नगरसेवकांना आपापल्या प्रभागातील विकासकामांवर भर देऊन मतदारांना आकर्षित करता येणार असून, विकासकामांचे प्रस्ताव शासनाकडून आयुक्तांकडे सादर होणार आहेत.

राज्यात सत्तांधर झाल्यापासून ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात मोठी रस्सीखेच सुरू आहे. ठाकरे गटाला कमकुवत करण्यासाठी शिंदे सेनेकडून एकही संधी सोडली जात नाही. नाशिक शहरातून शिंदे गटाच्या हाती आतापर्यंत काही लागले नव्हते. मात्र गेल्या आठवड्यात ठाकरे गटातील १२ माजी नगरसेवकांनी एकाच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. यामुळे ठाकरे गटाची ताकद कमी झाल्याने हा आघात भरून काढण्यासाठी ठाकरे गटाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शिवसेनेतील नाराजांना शिंदे गटात सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ठाकरे गटातून बाहेर पडताना नाशिकच्या विकासासाठी आपण मुख्यमंत्र्यांसोबत असल्याचे माजी नगरसेवकांचे नेतृत्व करणारे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी जाहीर केले. शिवसेनेत असताना विकासकामे नाही की आमच्या अडचणी, समस्या वरिष्ठांपर्यंत पोहचू दिल्या जात नसल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला आहे. या अडथळ्यांमुळेच शिंदे गटात सामील व्हावे लागल्याचे बोरस्ते यांच्यासह इतरही माजी नगरसेवकांचे म्हणणे आहे. विकास कामांच्या मुद्द्यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांना विकासासाठी १२ कोटींची भेट देण्याचे आश्वासन दिले असून, येत्या काळात याबाबतचे प्रस्ताव मंजूर करून ते मनपा प्रशासनाकडे अंमलबजावणीसाठी सादर केले जाणार आहेत.

महापालिकेत प्रशासक नियुक्त आहे. यामुळे नगरसेवकांचा महापालिकेशी गेल्या वर्षभरापासून फारसा संपर्क राहिलेला नाही. त्यामुळे मतदारांसमोर जाताना अडचणी निर्माण होणार असल्याने त्यापार्श्वभूमीवर मतदार संघातील विकास कामे करण्याकरता नगरविकास आणि मुख्यमंत्र्यांच्या निधीतून प्रभागांमध्ये विकास कामे करण्यात येणार आहेत.

नाशिक शहर विकासाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी देण्याचे आश्‍वासन आम्हाला दिले आहे. मनपा प्रशासनाला देखील तशा स्वरूपाच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. शहराचा विकास हेच आमचे ध्येय असून, त्याची प्रचिती नाशिककरांना नक्कीच येईल.

– अजय बोरस्ते, माजी विरोधी पक्षनेता, महापालिका, नाशिक

हेही वाचा :

The post नाशिक : शिंदे गटाच्या त्या माजी नगरसेवकांना १२ कोटींचे गिप्ट appeared first on पुढारी.