नाशिक : शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांत ठाकरे गट घेणार मेळावा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. नाशिकरोड परिसरातील चार नगरसेवकांचा यात समावेश आहे. पक्षांतर केलेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागात आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना मेळावा घेणार आहेत. यासाठी 25 डिसेंबरचा मुहूर्त ठरविला जातो आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नाशिकरोडकरांना राजकीय जुगलबंधी पहायला मिळणार आहे.

माजी नगरसेविका जयश्री खर्जुल, ज्योती खोले, सुर्यकांत लवटे, आर. डी. धोंगडे, प्रताप मेहोलोरीया तसेच चंद्रकांत लवटे यांनी काही दिवसांपुर्वी  उद्धव ठाकरे यांच्या शिवेसेनेत प्रवेश केला. नाशिकरोड परिसरातील राजकीय परिसरात ही मोठी घटना मानली जाते. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांच्या बालेकिल्ल्यातच हे पक्षांतर घडले. त्यामुळे गायकवाड यांना त्याचे शल्य बोचत आहे. गददारांना धडा शिकविण्यासाठी लवकरच त्यांच्या प्रभागात शिवसेनेचा मेळावा घेण्याचे नियोजन केले जाते आहे. यासंदर्भात दत्ता गायकवाड यांनी शिवसैनिकांची बैठक बोलवली होती. त्यामध्ये 25 डिसेंबरला मेळावा घेण्याची तारीख निश्चित करण्यात आल्याने नाशिकरोडचे राजकीय वातावरण यामुळे ढवळून निघणार आहे.

बरे झाले गेले

पक्षांतर केलेल्या माजी नगरसेवकांनी मागील काही वर्षापासून शिवसेनेत जागा अडवली होती. त्यांच्यामुळे दुस-या नवोदीत शिवसैनिकांना संधी मिळणे अवघड होते. या प्रवेशाचे ठाकरे गटाच्या शिवसेनेत दबक्या आवाजात स्वागतच केले जाते आहे. आता नविन अन निष्ठावंताना संधी मिळू शकते. त्यामुळे जे गेले ते बरेच झाले. अशी चर्चा ठाकरे गटाच्या शिवसेनेत केली जाते आहे.

पुंन्हा पक्षांतराचे संकेत

नाशिकरोड परिसरातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटात पुंन्हा फुट पडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. काही माजी नगरसेवक तसेच निष्ठावंत शिवसैनिकांचा यात समावेश आहे. खासदार हेमंत गोडसे हे दिल्ली येथील अधिवेशनातून परतल्यानंतर लगेच शिंद गटाच्या शिवसेनेचा प्रवेश सोहळा होणार असल्याचे बोलले जाते आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांत ठाकरे गट घेणार मेळावा appeared first on पुढारी.