नाशिक तालुक्यात मविआचे वर्चस्व, सात ग्रामपंचायतींवर झेंडा

नाशिक तालुका निवडणूक निकाल,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीत झालेल्या चुरशीच्या लढतीं मध्ये महाविकास आघाडीने वर्चस्व राखले आहे. तब्बल ७ ग्रामपंचायतींवर मविआचा झेंडा फडकला असून भाजपा, शिंदे गट व अपक्षांनी प्रत्येकी दोन ठिकाणी सत्ता काबिज केली आहे. एकलहरेमध्ये चिठ्ठीवर सचिन होलीन यांचा विजय निश्चित झाला.

नाशिक तहसिल कार्यालयात सकाळी १० पासून मतमोजणीला प्रारंभ झाला. तहसिलदार अनिल दौंडे यांच्या मार्गदर्शनात मतमोजणी करण्यात आली. अवघ्या तासाभरात निकालाचे कल हाती आल्यानंतर विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाने सर्वाधिक ५ सरपंच निवडून आणत ग्रामपंचायतींवर सत्ता काबिज केली आहे. त्याखालोखाल भाजपा, शिवसेना शिंदे गट व अपक्षांनी प्रत्येकी दोन ग्रामपंचायती ताब्यात केल्या. कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसला केवळ १-१ ग्रामपंचायती मिळाल्या आहेत.

समसमान मते पडल्याने चिठ्ठीचा अवलंब

यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्याभरात एकलहरे ग्रामपंचायतीत सर्वात कमी मतदानाची नोंद झाली. येथील प्रभाग दोनमधील उमेदवार सचिन होलीन आणि सागर बारमाटे या दोघांना समसमान २३० मते पडल्याने पेच निर्माण झाला. अखेर तहसिलदार दौंडे यांनी चिठ्ठीचा पर्याय अवलंबला. सार्थक सरोदे या विद्यार्थ्याच्या हस्ते चिठ्ठी काढली असता त्यात होलीन यांचे नाव निघाल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. तर बेळगावढगा ग्रामपंचायतीत एका प्रभागात उमेदवारांच्या मागणीनूसार फेरमोजणी पार पडली.

पक्षनिहाय ग्रामपंचायती

भाजपा २

ठाकरे गट ५

शिंदे गट २

काॅंग्रेस १

राष्ट्रवादी १

अपक्ष २

थेट सरपंच विजयी

ठाकरे गट :- मालती डहाळे (गणेशगाव), रविंद्र निंबेकर (तळेगाव), कविता जगताप (सामनगाव), प्रिया पेखळे (ओढा), एकनाथ बेझेकर (दुडगाव).

शिंदे गट :- किरण कोरडे (गिरणारे), कचरू वागळे (महिरावणी)

भाजपा :- अगस्ती फडोळ (यशवंतनगर), अरूण दुशिंग (एकलहरे)

कॉग्रेस :- पार्वता पिंपळके (देवरगाव),

राष्ट्रवादी :- सुरेश पारधी (साडगाव)

अपक्ष :-रेखा कडाळे (लाडची), सविता मांडे (बेळगावढगा)

हेही वाचा :

The post नाशिक तालुक्यात मविआचे वर्चस्व, सात ग्रामपंचायतींवर झेंडा appeared first on पुढारी.