नाशिक : गुटख्याची ठिकठिकाणी रंगपंचमी; कारवाईची नाही हमी

गुटखा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कोरोना महामारीचा सर्वच क्षेत्रातील व्यावसायिकांना फटका बसला असला तरी, अवैध गुटखा विक्री करणारे मात्र यास अपवाद आहेत. कारण बंदी असतानाही दिवसाढवळ्या गुटखा विक्रीचा गोरखधंदा जोरात सुरू आहे. गल्लोगल्ली पानटपऱ्या तसेच किराणा दुकानांवर गुटखा सहज उपलब्ध होतो. विशेष म्हणजे ही बाब प्रशासन जाणून आहे, मात्र चिरीमिरी मिळत असल्याने, त्यांनी झोपेचे सोंग घेत विक्रेत्यांना गुटखा विक्रीचे जणू काही अप्रत्यक्षरीत्या परवानेच बहाल केले आहेत.

‘अन्नसुरक्षा व मानके अधिनियम २००६’अंतर्गत राज्यात गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली आहे. बंदीची चोख अंमलबजावणी करण्याकरिता अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, सद्यस्थितीत दोन्ही यंत्रणा ढिम्म असून, विक्रेते मात्र सुसाट आहेत. महाराष्ट्रात चोरट्या मार्गाने गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करून त्याची विक्री केली जाते. गुटखा विक्रेत्यांचे नेटवर्क इतके मजबूत आहे की, प्रशासनालाही त्यांनी या व्यवसायात एक प्रकारे भागीदारच बनविले आहे. प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांतून गुटखा राज्यात आणला जातो. ही वाहतूक शक्यतो रात्रीच केली जाते. त्यानंतर रात्रीच्या अंधारातच विक्रेत्यांपर्यंत गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ पोहोचविले जातात. या व्यवसायात संपूर्णपणे ब्लॅकचा पैसा वापरला जातो. रोखीत देवाण-घेवाण होत असल्याने, त्याचा कुठेही पुरावा राहत नाही. दरम्यान, गुटख्याचा सर्वाधिक ग्राहक हा तरुणवर्ग आहे. बंदी असल्याने, विक्रेते ‘अवाच्या सवा’ किंमत आकारून गुटख्याची विक्री करीत आहेत. शाळा-महाविद्यालय परिसरातदेखील गुटखा विकला जात असल्याची धक्कादायक बाब यापूर्वीदेखील समोर आली आहे. अशात अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांनी धडक कारवाई करून गुटखा बंदीवर अंमलजावणी करावी, अशी मागणी केली जात आहे.

भद्रकाली गुटखा विक्रीचे हॉटस्पॉट 

शहरातील नाशिकरोड, उपनगर, भद्रकाली आणि मुंबई नाका या परिसरात गुटखा माफियांचे अड्डे आहेत. विशेषत: भद्रकाली परिसरात गुटखा मोठ्या प्रमाणात विकला जातो. छोट्या पानटपरीपासून ते मोठ्या दुकानांमध्ये गुटखा सहज उपलब्ध होतो. त्याचबरोबर नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरातदेखील गुटख्याची वारेमाफ विक्री सुरू असते. त्या व्यतिरिक्त नाशिक शहरालगत पालिका हद्दीच्या बाहेर मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या गावांत गुटख्याचा साठा करण्याची ठिकाणे आहेत. काही व्यापारी तर गुटख्याची ग्राहकांना घरपोच सेवा देत आहेत. ही बाब प्रशासनही जाणून आहे.

तक्रार करा, तरच कारवाई 

शहरात जागोजागी सर्रासपणे गुटखा विक्री सुरू असल्याची बाब अन्न व औषध प्रशासन जाणून आहे. मात्र, अशातही मनुष्यबळाचा अभाव असल्याचे सांगून कारवाईबाबत टाळाटाळ केली जाते. याबाबत प्रशासनाला विचारले असता, तक्रार प्राप्त झाल्यास आम्ही नक्की कारवाई करू असे सांगितले गेले. प्रशासनाच्या या भूमिकेमुळेच गुटखा विक्रेत्यांचे फावत असून, त्यांच्याकडून सर्रासपणे गुटखा विक्री सुरू आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : गुटख्याची ठिकठिकाणी रंगपंचमी; कारवाईची नाही हमी appeared first on पुढारी.