केसांवर फुगे नव्हे मिळताय भांडी

केसांवर भांडी,www.pudhari.news

अंबादास बेनुस्कर : पुढारी वृत्तसेवा धुळे(पिंपळनेर) 

केस विंचरताना खाली पडलेले केस महिला फेकून देत असतात. मात्र हे खाली पडलेले केस खराब नसतात. याच केसांवर अनेकांचा व्यवसाय सुरु आहे. महिलांचे केस विंचरताना गळालेले केस, अथवा-कंगव्याच्या फणीमध्ये साचलेला केसांचा गुंता घेऊन त्यावर भांडे विकणाऱ्या महिला गल्लोगल्ली फिरु लागल्या आहेत. हे केस देऊन गृहउपयोगी भांडी घेण्याच्या आशेने गृहिणी आता केस साचवू लागल्या आहेत.

केसांपासून विग तयार करणे हा मोठा व्यवसाय आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याला चांगली मागणी असते.  तसेच कृत्रिम दाढी, मिशा, अंबाडा आणि गंगावन बनवून त्याची विक्री  केली जाते. याशिवाय केसांचा वापर इतरही ठिकाणी वाढला आहे.  केसांची वाढती गरज व मागणी लक्षात घेता गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरामध्ये काही महिला गल्लोगल्ली, दारोदारी फिरुन महिलांचे केस विचरतांना गळालेले केस अथवा केसांचा गुंता विकत घेऊन त्यावर भांडी देते आहेत.

तसेच केसांची विक्री देखील केली जात आहे. एक हजार रुपये किलो असा सध्या केसांचा भाव आहे. मालेगाव, नाशिक, पुणे आदी ठिकाणी काही व्यापारी केस खरेदीचा व्यवसाय करतात. केसांच्या बदल्यात या महिला घरगुती वापरातील छोटे-मोठी भांडी देतात. या व्यावसायिकांना व दुकानदारांना केस विकून स्वत:चा उदरनिर्वाह या महिला करत आहेत. गृहिणीवर्गालाही केसांच्या मोबदल्यात भांडी मिळत असल्याने त्याही केस फेकून न देता साचून ठेऊ लागल्या आहेत. पिंपळनेरसह परिसरात १०० ते १५० हुन अधिक महिला केस गोळाकरण्यासाठी खेडोपाडी फिरत आहेत. त्यातून रोजगार मिळवत आहेत.

महिलांचेच केस ..

गंगावणे, टोप आदी कामांसाठी लांबसडक केस लागत असल्याने महिलांचेच केस विकत घेतले जातात. पुरुषांचे अथवा लहान केस विकत घेतले जात नाही. यामुळे महिला वर्गाकडून देखील तशी काळजी घेत केस साठवले जातात.

संसाराला हातभार…
घरोघरी जाऊन केस गोळा करुन ते विकून चार पैसे हातात पडत असल्याने संसाराला हातभार लागत आहे. अत्यंत कमी भांडवलामध्ये व्यवसाय करता येतो. मात्र, याकरिता खूप वणवण करावी लागते. दिवसभरात १०० ते २५० ग्रॅम केस गोळा होतात. कधी कधी ५० ग्रॅम देखील केस मिळत नाही. मात्र यामुळे अनेक गरीब महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
– लता गणेश गायकवाड (पाथर्डीगांव)

गळालेले अथवा गुंता झालेले केस अनेकदा मुक्या जनावरांच्या खाण्यात येत असतात. त्यातून जनावरांना विविध प्रकारचे आजार होतात. गळालेल्या केसांवर भांडी मिळू लागल्याने गृहीणी केस इतरत्र न फेकता सांभाळून ठेऊ लागल्याने आता प्राण्यांचे संरक्षण व सेवा देखील होत आहे. 

हेही वाचा :

The post केसांवर फुगे नव्हे मिळताय भांडी appeared first on पुढारी.