गुन्हेगारीत वाढ : अंबड एमआयडीसीसाठी पोलिस ठाण्याची गरज

पोलीस ठाणे www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
अंबड, चुंचाळे या गावांसह औद्योगिक वसाहतीत गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली असून, संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश येत नाही. भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या या भागावर अपुर्‍या मनुष्यबळाअभावी ‘वॉच’ ठेवणे अंबड पोलिसांना शक्य होत नसल्याचेही आजवर दिसून आले आहे. त्यामुळे अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी, शेतकरी, कामगारांसह कारखानामालकांकडून जोर धरू लागली आहे.

अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉइंट येथील कर्डेल मळ्यात शुक्रवारी (दि.25) रात्री अज्ञात चोरट्यांनी बच्चू कर्डेल (68) या वयोवृद्ध शेतकर्‍याची हत्या केली व कोठी चोरून नेली. या कोठीत काही कागदपत्रे, सोने व रोख रक्कम होती. कर्डेल यांच्या हत्येनंतर अंबड पोलिसांनी पाच ते सहा पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथके अंबड पोलिस ठाणे हद्द तसेच शहरात तपास करीत आहेत. यातील संशयितांचा शोेध लावण्यात तीन दिवसांनंतरही अद्याप पोलिस यंत्रणेला यश आलेले नाही. परंतु, या घटनेमुळे अंबडच्या मळे भागातील शेतकरी व नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. अंबड पोलिस ठाण्याचे भौगोलिक क्षेत्र मोठे आहे. त्या प्रमाणे पोलिस कर्मचारी संख्या अपुरी आहे. त्यामुळे सर्वत्र पोलिस पोहोचणे अवघड आहे. दुसरीकडे अंबड औद्योगिक वसाहतीत गुन्हेगारी वाढली आहे. पंधरा दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास संजीवनगर भागात गोळीबार झाला होता. संशयिताचे नाव निष्पन्न झाले असले तरी अद्यापही पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही. याच भागात दोन महिन्यांपूर्वी मोकळ्या मैदानावर युवकाचा खूनही झाला होता. अंबडसह चुंचाळे परिसरात गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी शासनाने अंबड पोलिस ठाण्याची विभागणी करून अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा:

The post गुन्हेगारीत वाढ : अंबड एमआयडीसीसाठी पोलिस ठाण्याची गरज appeared first on पुढारी.