ग्रामपंचायत निवडणूक : डॉ. देवरे निमोणच्या दुसर्‍यांदा सरपंच

चांदवड www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्याच्या पूर्व भागात प्रतिष्ठेच्या झालेल्या निमोण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत डॉ. भावराव ग्रामविकास पॅनलने थेट सरपंचपदासह सहा जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. प्रतिस्पर्धी परिवर्तन पॅनलला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. निमोणकरांच्या या विश्वासामुळे डॉ. स्वाती देवरे यांना दुसर्‍यांदा सरपंचपदी विराजमान होण्याचा मान मिळाला आहे.

निमोण ग्रामपंचायतीच्या एकूण नऊ जागांसाठी नुकतीच सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी भाजपचे युवा नेते डॉ. भावराव देवरे, माजी चेअरमन कांतीलाल निकम, चेअरमन दत्तात्रेय सोनवणे, वाल्मीक देवरे, रतन दखने, एकनाथ देवरे, हिरामण देवरे, भागाजी सोनवणे, नाना सोनवणे, म्हसू उगले आदींनी मिळून ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व केले होते. त्यांच्या विरोधात बाळासाहेब मावळे, भगवंत बाराहाते, मधुकर बोरसे, पंकज दखने यांच्या परिवर्तन पॅनल उभा केला होता. या चुरशीच्या लढाईत भाजपच्या माजी महिला तालुकाध्यक्षा डॉ. स्वाती देवरे यांनी 855 मते घेत प्रतिस्पर्धी अश्विनी बाराहाते यांचा 64 मतांनी पराभव केला. सदस्यपदाच्या जागेवर हनुमान दखने (358), प्रवीण बोडके (366), सुवर्णा सोनवणे (385), सुगंधाबाई खैरे (296), शोभा पिंपळे (217) आदी ग्रामविकास पॅनलचे उमेदवार सहा जागांवर निवडून आले आहेत. परिवर्तन पॅनलचे फक्त तीन उमेदवार निवडून आले. यात पंकज दखने (354), सुरेखा आहेर (278), अनिता अहिरे (260) आदींचा समावेश आहे.

दुसर्‍यांदा आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल गावकर्‍यांचे मनापासून आभार. मागील पाच वर्षांच्या विकासकामांची शिदोरी सोबत घेऊन उर्वरित विकासकामे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार व तालुक्याचे लाडके नेतृत्व आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली गावाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्याचे ध्येय आहे. – डॉ. स्वाती पाटील, थेट सरपंच, निमोण.

हेही वाचा:

The post ग्रामपंचायत निवडणूक : डॉ. देवरे निमोणच्या दुसर्‍यांदा सरपंच appeared first on पुढारी.