जळगावात रिकव्हरी एजंटच निघाला दुचाकीचोर

जळगाव,www.pudhari,news
जळगाव : शहरात गेल्या काही दिवसांपासून मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी प्राप्त तक्रारीनुसार तपास सुरू केला असून, मोटरसायकल चोरी करणाऱ्या एका संशयीताला एरंडोल येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच मोटरसायकल हस्तगत केल्या असून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत रामदास साळुंखे (वय-४२) रा. हिराशिवा कॉलनी, जळगाव असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे संशयित आरोपी रिकव्हरी एजंट म्हणून काम करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
जिल्हापेठ पोलिसांच्या हद्दीसह इतर ठिकाणी दुचाकी चोरीचे सत्र सुरू असल्याने जिल्हापेठ पोलीस एका गुन्ह्याचा तपास करीत असताना संशयित चंद्रकांत साळुंखे हाच दुचाकींची चोरी करत असल्याचे समोर आले. जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळाच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे संशयित आरोपी चंद्रकांत रामदास साळुंखे याची माहिती मिळाली. त्यानंतर अधिक माहिती मिळविली असतांना संशयित आरोपी हा एरंडोल शहरात असल्याचे कळताच त्यास अटक करण्यात आली. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सलीम तडवी, रवींद्र साबळे, तुषार पाटील, महिला पोलीस नाईक भारती देशमुख यांनी संशयित आरोपी चंद्रकांत साळुंखे याला एरंडोल शहरातून ताब्यात घेतले.

The post जळगावात रिकव्हरी एजंटच निघाला दुचाकीचोर appeared first on पुढारी.