नाशिक : पेसा क्षेत्रातील शिक्षकभरती लवकरच

जिल्हा परिषद नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अनुसूचित जमाती – (पेसा क्षेत्रातील) शिक्षक पदभरतीबाबत शासन निर्णयानुसार वित्त विभागामार्फत रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरण्यास शासनाकडून परवानगी मिळाली आहे. परिणामी नाशिकसह इतर जिल्हा परिषदांमधील आदिवासी भागातील उमेदवारांची तत्काळ पदभरती सुरू होणार आहे. यात अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे, यवतमाळ आदी जिल्हा परिषदांचा समावेश आहे.

नाशिक जिल्हा परिषदेला प्राप्त शासन आदेशानुसार जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, इगतपुरी, बागलाण, देवळा या तालुक्यांतील पेसा क्षेत्रातील उमेदवारांची तत्काळ प्रभावाने पदभरती सुरू होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये साधारणत: ४५० पदसंख्या असून, याच्या ८० टक्के म्हणजेच सुमारे ३६० जागा भरण्यात येणार आहेत.

जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून, समिती पूर्ण यादीचा आढावा घेणार आहे. यासाठी स्वतंत्र पेसा भरती कक्ष स्थापन करण्याचे आदेश असून, शासन आदेशानुसार पदभरती कार्यवाहीला तत्काळ सुरुवात केली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत सात तालुक्यांमधून माहिती मागवणार आहे. त्यानंतर आठ ते दहा दिवसांत तत्काळ पदभरती प्रक्रियेस सुरुवात होईल.

आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

पेसा क्षेत्रातील पदभरतीबाबत घेतलेल्या टेट-2022 मधील उत्तीर्ण उमेदवारांची यादी शासनाकडून प्राप्त होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेत पेसा भरती कक्ष स्थापन केला असून, टेट-2022 उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्राप्त होताच ज्येष्ठतेनुसार गुणवत्ताधारक पेसा उमेदवारांची निवड होणार आहे.

– नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, नाशिक

हेही वाचा :

The post नाशिक : पेसा क्षेत्रातील शिक्षकभरती लवकरच appeared first on पुढारी.