जळगाव : आरटीओचे नियम धाब्यावर, बोरवेल वाहनावर कारवाई

जळगाव

जळगाव : पुढारी वृत्तसेवा -जळगाव जिल्ह्यातील आरटीओ विभागाने रस्त्यावर धोकादायक रित्या चालणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत, अडावद ते चोपडा रस्त्यावरील वाहन तपासणीत बोरवेल खोदणारे वाहन क्रमांक एम एच 27 डी ए 1194 हे अत्यंत खराब तांत्रिक अवस्थेत आढळून आले. या वाहनाची तपासणी केली असता, वाहनाला डिझेल टॅंक नसून ड्रायव्हर केबिनमध्ये प्लास्टिकच्या ड्रममध्ये डिझेल भरून ठेवून इंजिनला डिझेल पुरवठा करताना आढळून आले. हे अत्यंत धोकादायक असून वाहन कधीही पेट घेण्याची दाट शक्यता होती. तसेच, वाहनाचा भाग असलेला क्रेनचा पार्ट वाहनाच्या पुढील बाजूस दहा मीटर लांब लोंबकळलेल्या स्थितीत असून रस्त्यावर असलेल्या वीज वाहक तारांना स्पर्श करून शॉर्ट सर्किट होण्याची दाट शक्यता होती.

या पार्श्वभूमीवर, वायूवेग पथकाने खबरदारीचा उपाय म्हणून सदर वाहनावर मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई करून चोपडा बस आगार येथे अटकावून ठेवण्यात आले आहे. आरटीओ विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी सांगितले की, “अशा धोकादायक वाहनांवर कडक कारवाई केली जाईल.

दि.  18 रोजी रावेर येथे एका प्रवासी बस ने पेट घेतल्याची घटना घडल्या मुळे प्रादेशिक परिवहन विभाग सतर्क झाला असून रस्त्यावर धोकादायक रित्या चालणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करीत आहेत. दोनच दिवसां पूर्वी धोकादायक आसन व्यवस्था असलेल्यां सहा प्रवासी बसेस वर कारवाई करून अटकावून ठेवण्यात आल्या आहेत. सदर कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्या मार्गदर्शनाखाली वायूवेग पथक क्रमांक 1 मधील मोटार वाहन निरीक्षक नितीन लक्ष्मण सावंत, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गणेश लव्हाटे, श्रीमती नूतन झांबरे, व वाहन चालक किशोर मोघे यांनी केली आहे.

The post जळगाव : आरटीओचे नियम धाब्यावर, बोरवेल वाहनावर कारवाई appeared first on पुढारी.