जळगाव : एरंडोलमध्ये मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या

सत्यवान धोंडू महाजन www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

भातखंडे गावाजवळील गिरणा नदीपात्रात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या मृतदेहाची ओळख पटली असून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सख्या भावानेच किरकोळ वादातून लहान भावाची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

सत्यवान धोंडू महाजन (५५, रा.उत्राण ता.एरंडोल) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मारेकरी मोठा भाऊ भगवान महाजन याला अटक केली असून कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरणा नदीपात्रातील इसमाची बुडून म़त्यू झाल्याची प्राथमिक चर्चा होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासानुसार मयत सत्यवान महाजन यांचा मोठा भाऊ भगवान धोंडू महाजन यानेच हत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी भगवान यास अटक केली आहे.

आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली…
भगवान महाजन याला ताब्यात घेत पोलिसांनी चौकशी केली असता, भगवान महाजन (६२) आणि सत्यवान महाजन (५५) हे दोन्ही भाऊ एरंडोल तालुक्यातील उत्राण (गु.ह.) गावातील रहिवासी आहेत. दोन्ही एकाच घरात वास्तव्यास असून त्यांच्यात अनेकदा किरकोळ गोष्टींमुळे कुरबुरी होत होत्या. दि. १२ सप्टेंबर रोजी सत्यवान महाजन यांनी घरातील मोरीत लघुशंका केल्यावरून वाद झाला. यावरुन संतापलेल्या भगवान याने डोक्यात मुसळी हाणल्याने सत्यवान महाजन यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर भगवानने मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवला. त्यानंतर रात्री उशीरा भगवान याने गोणीव्दारे मृतदेह गिरणा नदीच्या पात्रात फेकून दिला. दुसरीकडे गिरणापात्रात मृतदेह आढळून आल्यानंतर भगवान हा घरातून गायब झाल्याने पोलिसांनी एरंडोल बस स्थानकावरून भगवान महाजन यास अटक केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या संदर्भात कासोदा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : एरंडोलमध्ये मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या appeared first on पुढारी.