जळगाव : मधुकर साखर कारखाना विक्रीला स्थगिती; आमदार सुरेश भोळे यांनी विधानसभेत मांडला प्रश्न

मधुकर www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील फैजपूर येथील मधुकर साखर कारखान्याच्या विक्रीला अखेर कर्मचार्‍यांच्या आक्रमक भूमिकेनंतर स्थगिती मिळाली आहे. आमदार सुरेश भोळे यांनी नागपूर विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर सहकार मंत्र्यांनी कारखान्याच्या विक्री प्रक्रियेला स्थगिती देण्याची घोषणा केल्याने समाधान व्यक्त होत आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी बँक सिक्युरटायझेशन नियमाच्या अंतर्गत मधुकर सहकारी साखर कारखान्याची विक्री केली. त्यामुळे खाजगी मालकाने गाळप हंगाम सुरू केला आहे. नवीन मालकांनी कर्मचार्‍यांची थकीत देणी देण्यास नकार केल्याने कर्मचार्‍यांनी दोन दिवसांपासून आंदोलन सुरू केले. बुधवारी, दि.28 रोजी सकाळपासूनच आक्रमक पवित्रा घेत रस्ता रोको आंदोलन सुरू केले.

जिल्हा बँक अध्यक्षांना घेराव….
जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी बुधवारी, दि.28 सकाळी साडेअकराच्या सुमारास साखर कारखान्याला भेट दिली. यावेळी गेटवरच कर्मचार्‍यांनी त्यांचे वाहन अडवून आक्रमक भूमिका घेत रोष व्यक्त केला. काहीही झाले तरी आंदोलन मागे न घेण्याचा इशारादेखील कामगारांनी दिला.

आमदार भोळे यांनी विधानसभेत उचलला मुद्दा…
केवळ 15 कोटींमध्ये कारखान्याची विक्री कशी असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. बुधवारी, दि.28 जळगावचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी विधानसभेत या संदर्भात प्रश्न उपस्थित करून मधुकर साखर कारखान्याच्या निविदा प्रक्रियेचा मुद्दा उपस्थित केला. शेतकरी आणि कर्मचार्‍यांची मोठ्या प्रमाणात देणी बाकी असतांना फक्त 15 कोटी रूपये घेऊन खासगी मालकाच्या ताब्यात हा कारखाना कसा दिला ? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली. यावर सहकार मंत्र्यांनी निविदा प्रक्रियेला स्थगिती देत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कर्मचा-यांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : मधुकर साखर कारखाना विक्रीला स्थगिती; आमदार सुरेश भोळे यांनी विधानसभेत मांडला प्रश्न appeared first on पुढारी.