जळगाव मनपाच्या आकृतिबंधास शासनाची मान्यता : आ. राजूमामा भोळे

rajumama Bhole www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

शहर महानगरपालिकेच्या नवीन आकृतिबंधास शासनाची मान्यता मिळाली असून, तब्बल मनपातील विविध ४५० पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी आमदार सुरेश भोळे यांच्याकडून प्रयत्न सुरू होते त्याला यश मिळाले आहे.

जळगाव शहर महानगरपालिका ही ‘ड’ वर्गात समाविष्ट असून, सद्यस्थितीत तत्कालीन जळगाव नगर परिषदेच्या मंजूर आकृतिबंध व सेवा प्रवेश नियमावलीनुसार कामकाज करण्यात येत होते. तसेच शहराची वाढती लोकसंख्या व त्यामुळे पायाभूत सुविधांवर पडणारा ताण, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची सक्षमपणे अंमलबजावणी करणे, लोककल्याणकारी व पारदर्शी कामकाजाची नागरिकांकडून होणारी मागणी व त्या अनुषंगाने वाढलेले प्रशासकीय कामकाज लक्षात घेता जळगाव शहर महानगरपालिकेच्या आकृतिबंधास तातडीने मान्यता मिळणे आवश्यक होते. दरवर्षी कर्मचारी निवृत्त होतात. मात्र, त्याजागी सक्षम कर्मचारी नेमला जात नसल्याने त्याचा फटका शहरातील नागरिकांना बसतो आहे. कर्मचारी भरण्याचा शहर महानगरपालिकेच्या नवीन आकृतिबंधाचा विषय अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने आमदार सुरेश भोळे यांनी शासनस्तरावर सतत पाठपुरावा करत हा प्रश्न मार्गी लावला आहे. त्यानुसार बुधवारी (दि.15) मिळालेल्या माहितीनुसार जळगाव महानगरपालिकेच्या नवीन आकृतिबंधास शासनस्तरावर मान्यता मिळाली असून, जळगाव महानगरपालिकेत ४५० पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. भरतीचा मार्गसुद्धा लवकरच पूर्ण होणार असून, लेखापरीक्षण संदर्भातदेखील लवकरच योग्य तो निर्णय देण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालय नगर विकास खात्याकडून मिळाल्याचे आ. भोळे यांनी कळविले आहे. शहराच्या विकासाला गती येईल, असा विश्वास दाखवत आ. भोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

१२ कर्मचाऱ्यांना मिळणार न्याय
यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले असून, मनपातील शिक्षणाची अट असलेल्या १२ रोजंदारी कर्मचाऱ्यांचीसुद्धा सेवेत सामावून घेण्याबाबतच्या प्रस्तावाससुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे. शासनाकडून मान्यता मिळाल्याने भविष्यात योग्य यंत्रणेमार्फत मनपात विविध पदांची भरती होईल.

हेही वाचा:

The post जळगाव मनपाच्या आकृतिबंधास शासनाची मान्यता : आ. राजूमामा भोळे appeared first on पुढारी.