नाशिक जिल्ह्यातील दोघांना निवडणूक लढण्यास बंदी, हे आहे कारण

निवडणुका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- निवडणूक आयोगाने राज्यातील ५० नावांची यादी प्रसिद्ध करत संबंधित व्यक्तींना विविध कारणांनी निवडणूक लढण्यावर बंदी घातली आहे. या यादीत निवडणूक खर्च सादर न केलेल्या नाशिक जिल्ह्यातील दोन उमेदवारांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही बंदी कायम असणार आहे.

निवडणूक प्रक्रियेत मतमोजणी टप्पा पार पडल्यानंतर 30 दिवसांच्या आत उमेदवारांना त्यांनी केलेला खर्च आयोगाकडे सादर करणे बंधनकारक असते. परंतु, २०१४ साली निवडणूक लढलेल्या काही उमेदवारांनी अद्यापही आयोगाकडे खर्च सादर केलेला नाही. वारंवार नोटीस बजावूनही या उमेदवारांकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे दि. ५ जुलै २०२१ रोजी संबंधितांना अपात्र घोषित करण्यात आले होते. आयोगाच्या निर्देशानुसार तेथून पुढील तीन वर्षे म्हणजेच जुलै २०२४ पर्यंत हे सर्व उमेदवार अपात्र असतील. त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणूक लढविण्यास मज्जाव करण्यात आला आहे. विहित वेळेत खर्चाचे सादरीकरण न केल्यामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघातील गोविंदा बोराळे आणि नाशिक पूर्वचे महेश आव्हाड या दोघांवर निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक लढविण्याची त्यांना मुभा असेल. मात्र, त्यावेळीही त्यांना आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागेल, अशी माहिती निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली.

हेही वाचा –

The post नाशिक जिल्ह्यातील दोघांना निवडणूक लढण्यास बंदी, हे आहे कारण appeared first on पुढारी.