दरडीच्या भीतीमुळे शेकडो कुटुंबे मृत्युछायेत

सुपलीची मेट

नाशिक : गणेश सोनवणे

त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत वसलेल्या वस्त्या भूस्खलनाच्या छायेत आहेत. आजवर ज्या ब्रह्मगिरीच्या आश्रयाने हे नागरिक निर्धास्तपणे राहात होते, आज त्याच पर्वताची त्यांना भीती वाटत आहे. पर्वताला मोठ-मोठ्या चिरा पडल्या आहेत. पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. कधी दरड कोसळेल, त्याचा नेम नसल्याने जीव मुठीत घेऊन हे लोक राहतात. त्यामुळे त्यापूर्वीच आमचे सुरक्षित, सखल जागेवर व कायमस्वरूपी पुनर्वसन करावे अशी मागणी येथील ग्रामस्थांची आहे. मात्र प्रशासकीय कामातील दिरंगाईने अजूनही हे स्थलांतर लालफितीतच आहे.

मेटघर किल्ला (ता. त्र्यंबकेश्वर) ग्रामपंचायती अंतर्गत सुपलीची मेट, गंगाद्वार, जांबाची वाडी, पठारवाडी, विनायक खिंड अशा पाच मेट (वस्त्या) येथे आहेत. या भागात सुमारे अडीचशेहून अधिक कुटुंबे व 1300 हून अधिक लोकवस्ती आहे. सात वर्षांपूर्वी विनायक खिंड वस्तीवर दरड कोसळली होती. त्यात एकजण जागीच ठार झाला. त्या घटनेची सगळ्यांनीच धास्ती घेतली. त्यानंतर विनायक खिंड येथील नागरिकांचे पेगलवाडीच्या डोंगराकडे पत्र्याच्या शेडमध्ये स्थलांतर करण्यात आले. मात्र, या लोकांनाही तेथील बांधकाम व्यावसायिक व भूमाफियांचा त्रास सहन करावा लागत आहे.

सुपलीची मेट आणि गंगाद्वार मेट या दोन वस्त्यांमधील सुमारे 134 कुटुंबांचे स्थलांतर करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती देताना, त्यासाठी 1.82 हेक्टर आर जागा निश्चित झाली असून, सातबाऱ्यावर आमची नावेही लागल्याचा दावा येथील ग्रामस्थांनी केला आहे. मात्र, अजून ही जागा शासनाने त्यांच्या ताब्यात दिलेली नाही. या दोन वस्त्यांचा प्रश्न मिटल्यानंतर जांबाची वाडी व पठारवाडी येथील परिस्थितीही चिंताजनक आहे. पावसाळ्यात वेळेवर धावपळ करण्यापेक्षा त्यापूर्वीच स्थलांतर करण्यात यावे अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी केली आहे.

त्या घटना आठवल्यावर थरकाप उडतो…

माळीण व इर्शाळवाडीतील दरड दुर्घटना आठवल्यावर आजही आमचा थरकाप उडतो. पावसाळ्यात येथे धोधो पाऊस पडतो. दरड कोसळण्याची भीती वाटते. आठ महिने येथे कुणीही येऊन बघतसुद्धा नाही. पावसाळा आल्यावर यंत्रणेला जाग येऊन सुपलीची मेट आठवते. अचानक गाड्यांचा ताफा येतो. शूटिंग करतात, परिस्थिती बघून जातात आणि नेहमीप्रमाणे पुढे काहीही होत नाही. अशी कैफियत सुपलीची मेट येथील ग्रामस्थ वैशाली झोले यांनी मांडली.

आम्हाला कायमस्वरूपी व सुरक्षित असे स्थलांतर हवे आहे. जिथे स्थलांतर करणार आहेत, तिथे वीज, पाणी व आवश्यक सुविधा शासनाने आधीच उपलब्ध करुन द्याव्यात. आमच्या रोजगाराचेही पाहावे‌. त्यानंतरच स्थलांतर करावे.

– जगन झोले, माजी सरपंच

…………..

जिथे स्थलांतर करावयाचे आहे, ती वनविभागाची जागा आहे. त्यामुळे अगोदर ती जागा मिळवणे महत्त्वाचे आहे. तिथे वस्ती वसविण्यासाठीच्या हिशेबाने जागा मिळावी म्हणून वनविभागाला सुधारित प्रस्ताव पाठवला आहे. त्यात एकुण घरांची संख्या, लोकवस्ती अशी सर्व माहिती पाठवली आहे. वनविभागाकडून जागा मिळाल्यावरच स्थलांतराची पुढची प्रक्रिया होईल.

– श्वेता संचेती, तहसीलदार त्र्यंबकेश्वर

हेही वाचा –

The post दरडीच्या भीतीमुळे शेकडो कुटुंबे मृत्युछायेत appeared first on पुढारी.