नाशिक : जिल्हा परिषदेमार्फत आदर्श गाव योजना सुरू, पहिल्या टप्प्यात ५१ गावांचा समावेश

आदर्श गाव योजना,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५१ गावे स्मार्ट करण्यात येणार आहेत. त्याबाबतचा आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी निर्गमित केला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्मार्ट व्हिलेज संकल्पना राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातून काही गावांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांना प्राधान्याने काही योजना देण्यात आल्या आहेत.

पालकमंत्री दादा भुसे यांनी स्मार्ट व्हिलेज ही संकल्पना स्पष्ट केली होती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी याबाबत जिल्ह्यातील आर. आर. पाटील पुरस्कारप्राप्त गावांचा समावेश या योजनेत करत त्यासाठी नियोजन सुरू केले आहे. प्राथमिक स्तरावर ३६ निकषांवर काम करण्यात येत असून, त्यातून स्मार्ट व्हिलेज संकल्पना पूर्णत्वास येणार आहे.

सन 2023-24 या आर्थिक वर्षात नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील 3 याप्रमाणे एकूण 45 गावांची निवड करण्यात येत आहे. त्यानुसार संबंधित सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य आणि ग्रामपंचायतीशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येऊन त्या ग्रामपंचायतींचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.

ही आहेत गावे

दरी, मुंगसरे, कोटमगाव, गणेशगाव, माणिकखांब (नाशिक)

शिरसाठे, मोडाळे, नागोसली (इगतपुरी)

वेळुंजे, काचुर्ली, आंबोली, वाघेरा (त्र्यंबकेश्वर)

कोपुर्ली बु., शेवखंडी, बोरवठ (पेठ)

बुबळी, हातरुंडी, म्हैसखडक (सुरगाणा)

करंजवण, कोल्हेर, गोंडेगाव (दिंडोरी)

सुळे, नांदुरी, मेहदर (कळवण)

पिंपळदरे, रातीर, नवे निरपूर (बागलाण)

वरवंडी, खालप, माळवाडी (देवळा)

राजदेरवाडी, हिरापूर, नन्हावे, रायपूर (चांदवड)

निळगव्हाण, बेळगाव, मुंगसे (मालेगाव)

बोराळे, श्रीरामनगर, भालूर (नांदगाव)

महालखेडा, सायगाव, एरंडगाव खु. (येवला)

थेरगाव, आहेरगाव, साकोरे मिग (निफाड)

वडांगळी, चिंचोली, दातली, किर्तांगळी, ठाणगाव (सिन्नर)

हेही वाचा : 

The post नाशिक : जिल्हा परिषदेमार्फत आदर्श गाव योजना सुरू, पहिल्या टप्प्यात ५१ गावांचा समावेश appeared first on पुढारी.