जळगाव : रोहिणी खडसे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

जळगाव www.pudhari.news

जळगाव : पुढारी ऑनलाईन डेस्क

‘शासन आपल्या दारी’ शासनाच्या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंगळवार, दि.27 जून रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर येत आहे. यादरम्यान, हा जिल्हास्तरीय कार्यक्रम हा शासनाचा आणि जनतेचा आहे. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यापेक्षा सार्वजनिक कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले होते. तसेच मुख्यमंत्री यांच्या मंगळवार, दि.27 जून आगमनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात कापूस व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, सोडविण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने केली असता, पोलिसांनी धरपकड केली. यात रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

जिल्ह्यातील मंजूर प्रकल्प अन्यत्र पळविले जाणे, भीषण टंचाई, बिघडलेली कायदा-सुव्यवस्था या सर्व प्रश्‍नांवर कोणतेही ठोस आश्‍वासन न मिळाल्याने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा आमदार एकनाथ खडसे यांनी दिला होता. त्यानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी काळे झेंडे जप्त करून निदर्शने करणाऱ्यांना ताब्यात घेतले.

कापसाला भाव नसल्याने निम्म्याहून अधिक कापूस आजही शेतकऱ्यांच्या घरात आहे. कांदा उत्पादक मेटाकुटीस आला आहे. जिल्ह्यातील प्रकल्प अन्य जिल्ह्यांमध्ये पळवून लावले. कायदा-सुव्यवस्थेसह पाणीटंचाईवर शासन गंभीर नाही. या सर्व प्रश्‍नांबाबत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती. माजी मंत्री व आमदार एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते.

The post जळगाव : रोहिणी खडसे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात appeared first on पुढारी.