जळगाव : लहान मुलांच्या तस्करी रॅकेटचा भांडाफोड; दानापूर एक्स्प्रेसमधून ५९ बालकांची सुटका

लहान मुले तस्क्ररी www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

बिहारमधून महाराष्ट्रात लहान मुलांच्या तस्करीचं एक मोठं रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. बिहार मधील ५९ अल्पवयीन मुलांची तस्करी होत असताना जळगाव व मनमाड रेल्वे स्थानकावर पोलिसांनी मुलांची सुटका केली आहे. यात मनमाडला ३० तर जळगावला २९ मुलांची सुटका करण्यात आली आहे. या मुलांची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाच्या रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे गाडी क्रमांक ०१०४० दानापूर – पुणे एक्सप्रेस मध्ये मदरशाच्या नावाखाली पूर्णिया जिल्ह्य़ातून सांगलीत त्यांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे भुसावळ रेल्वे स्थानकातुन गाडी सूटल्यानंतर मनमाड स्थानकापर्यंत कसून तपासणी केली असता गाडीतील वेगवेगळ्या बोगीतून एका तस्करासह ८ ते १५ वयोगटातील २९ मुलांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर धावत्या रेल्वे गाडीत मनमाडपर्यंत केलेल्या तपासादरम्यान आणखी ३० मुले आणि ४ तस्करांची ओळख पटली आणि त्यांना मनमाड स्थानकात ताब्यात घेण्यात आले. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी चार संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहान मुलांची तस्करी होत असल्याची टीप पोलिसांना एका स्वयंसेवी संस्थेने दिली होती. त्यानुसार ही कारवाई केली गेली आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : लहान मुलांच्या तस्करी रॅकेटचा भांडाफोड; दानापूर एक्स्प्रेसमधून ५९ बालकांची सुटका appeared first on पुढारी.