नाशिकमध्ये दर शनिवारी पाणीपुरवठा राहणार बंद?

पाणीपुरवठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, मुकणे व दारणा धरणातून जायकवाडीसाठी विसर्ग करण्यात आल्याने महापालिकेच्या पाणी आरक्षण मागणीत ७८६ दशलक्ष घनफूटीने कपात होणार असल्यामुळे उपलब्ध पाणीसाठा जुलै २०२४ पर्यंत पुरण्यासाठी नाशिककरांवर १५ टक्के पाणीकपात लादली जाणार आहे. याअंतर्गत येत्या डिसेंबरपासून आठवड्यातील दर शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांना पाणीपुरवठा विभागातर्फे सादर करण्यात आला आहे. गुरूवारी (दि.३०) या प्रस्तावावर निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पाणीकपात रोखण्यासाठी प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून केला जात असल्याची चर्चा आहे.

नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून मराठवाड्याकरीता जायकवाडी धरणाच्या दिशेने ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचे निर्देश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने देखील या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर अखेर नाशिकच्या गंगापूर, दारणा व मुकणे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे आधीच दुष्काळी परिस्थिती असताना नाशिक जिल्ह्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्याचा पहिला फटका महापालिकेला बसला आहे. १५ ऑक्टोबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीसाठी गंगापूर धरण समुहातून ४४००, दारणा धरणातून १०० तर मुकणे धरणातून १६०० असे एकुण ६१०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी महापालिकेने जलसंपदा विभागाकडे नोंदविली होती. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे केलेल्या पत्रव्यवहारानुसार जलसंपदा विभागाने महापालिकेसाठी गंगापूर धरण समुहातून ३८०७, दारणा धरणातून १०० तर मुकणे धरणातून १४०७ असे एकूण ५,३१४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिकच्या पाणीआरक्षण मागणीत तब्बल ७८६ दशलक्ष घनफूट पाण्याची कपात होणार आहे.

सध्या नाशिक शहराला दररोज ५४० ते ५६० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे उपलब्ध पाणी जपून वापरण्यासाठी पंधरा टक्के कपात अटळ आहे. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने नियोजन केले असून आठवड्यातून एक दिवस संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. दर शनिवारी शासकीय कार्यालये तसेच औद्योगिक कामगारांना सुटी असते. एमएसईबीकडूनही या दिवशी शटडाऊन घेतला जात असतो. त्यामुळे आठवड्यातील दर शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवल्यास नागरिकांना त्याचा कमी त्रास होईल, असे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार आयुक्तांसमोर प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यावर गुरूवारी(दि.३०) निर्णय घेतला जाणे अपेक्षित आहे.

टँकरद्वारे पाणीपुरवठा

पाणीकपातीचा अधिक फटका बसू नये यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्थाही महापालिकेकडून केली जाणार आहे. विशेषत: जुने नाशिक व सिडको विभागांमध्ये राहणाऱ्या नागरीकांकडे पाणी साठवण क्षमता नाही. त्यामुळे या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.

जायकवाडीला विसर्गानंतर नाशिकच्या पाणीआरक्षणात कपात होऊ शकते. यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या अधिकृत निर्णयाचा प्रतिक्षा असली तरी पाणीकपातीचे नियोजन करावे लागणार आहे. त्यादृष्टीने पाणीपुरवठा विभागाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

– डॉ. अशोक करंजकर, आयुक्त, महापालिका.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये दर शनिवारी पाणीपुरवठा राहणार बंद? appeared first on पुढारी.