अद्वय हिरेंनंतर आता अपूर्व हिरेंवरही गुन्हा दाखल

अद्वय हिरे, अपूर्व हिरे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-महाविद्यालयात मुलास नोकरी लावून देताे, असे आमिष दाखवून आर्थिक गंडा घातल्याप्रकरणी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे विश्वस्त तथा माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे (Apoorva Hire) यांच्यासह इतर तिघांविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तम काळू चौधरी (६४, रा. वडनेर गेट) यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी २०१७ ते २०२३ या कालावधीत मुलास पंचवटी येथील हिरे महाविद्यालयात नोकरी देतो, असे आमिष दाखवून गंडा घातला. त्यानुसार कल्पेश प्रभाकर बोरसे, दीपक झिप्रू चव्हाण, अमर रामराजे व अपूर्व हिरे यांच्याविराेधात गुन्हा दाखल आहे.

चौधरी यांच्या फिर्यादीनुसार संशयित कल्पेश बोरसे याने चौधरी यांना जानेवारी २०१७ मध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवले. ‘माझी हिरे महाविद्यालयात-पंचवटी कॉलेज संस्थेत ओळख आहे. सध्या तेथे जागा निघाल्या आहेत. तिथे मी तुमच्या मुलाचे काम करून देतो’ असे कल्पेशने चौधरी यांना सांगितले. त्यानंतर कल्पेश याने चौधरी यांना महात्मानगर येथील कार्यालयात नेत संशयित डॉ. अपूर्व हिरे यांच्याशी बोलणे करून दिले. हिरे यांनी मुलास नोकरी देण्याचे आश्वासन देत मुलाचे कागदपत्रे व पैसे दीपक चव्हाण यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार चौधरी यांनी कागदपत्रे व दोन लाख ६५ हजार रुपयांचे दोन धनादेश तसेच एक लाख ३५ हजार रुपये रोख संशयितांना दिले. दरम्यान, संशयितांनी दोन्ही धनादेश अमर रामराजे यांच्या बँक खात्यात वटवले होते. दोन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर बोरसे याने नोव्हेंबर २०१९ मध्ये चौधरी यांना भेटून तुमच्या मुलाचे काम झाले असून, उर्वरित पैसे द्या, आठ दिवसांत काम होईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे चौधरी यांनी बोरसेला पाच लाख रुपये रोख स्वरूपात दिले होते.

दिलेल्या धनादेशाचे बँक खातेही बंद

पैसे घेतल्यानंतर बोरसे याने उडवाउडवीचे उत्तरे दिले. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर संशयित चव्हाण याने १५ नोव्हेंबर २०२२ रोजी पाच लाख रुपयांचा चौधरी यांना धनादेश दिला. मात्र तो बँकेत वटला नाही. तपास केला असता धनादेश असलेले बँक खाते १० वर्षांपूर्वीच बंद झाल्याचे समोर आले. जानेवारी २०२३ मध्ये बोरसे याने दिलेला दुसरा धनादेशही बॅंकेत वटला नाही. त्यानंतर संशयिताने शिवीगाळ करीत धमकावल्याचे चौधरी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अखेर चौधरी यांनी संशयित बाेरसे, चव्हाण, रामराजे व डॉ. हिरेंविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा :

The post अद्वय हिरेंनंतर आता अपूर्व हिरेंवरही गुन्हा दाखल appeared first on पुढारी.