निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अॅक्शन मोडवर, चार सराईतांवर तडीपारीची कारवाई

तडीपार www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यासह तडीपारीची कारवाई करण्याचा पोलिसांकडून सपाटा सुरू आहे. अशाच आणखी चार सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीतील नवाज अकील शेख (२५, रा. घर. नं. १६, गरीब नवाज कॉलनी, वडाळा गाव) व किरण ऊर्फ बिटवा रमेश मल्हारी (२९, रा. ए-२, रूम नं. ३२, म्हाडा वसाहत, वडाळागाव) यांच्यावर इंदिरानगर पोलिस स्टेशन हद्दीत मारहाण करून जबरी चोरी, दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र येवून दरोड्याची पूर्व तयारी, अनाधिकृतपणे घरात घुसून मारहाण, रात्री घरफोडी, मनाई आदेशांचे उल्लंघन, अनाधिकृतपणे घातक हत्यार बाळगणे आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच अंबड पोलिस ठाणे हद्दीतील सनी ऊर्फ मॉन्टी रमेश दळवी (३१, रा. सी-२, अभिनव राे. हाऊस, पवननगर, पाण्याच्या टाकीजवळ, कामटवाडे) व पवन विनायक वायाळ (२६, रा. नेहरू चौक, सावतानगर, सिडको) यांच्यावर अंबड पोलिस ठाणे हद्दीत मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, बेकायदेशीर अग्निशस्त्र व जीवंत काडतूस जवळ बाळगणे, मारहाण करून दुखापत करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून घातक हत्याराने गंभीर दुखापत करून ठार मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर घातक शस्त्र जवळ बाळगणे, शिवीगाळ व दमदाटी करणे आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

त्यामुळे या चौघांकडूनही शहरात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियमाअंतर्गत तडीपारीची कारवाई केली आहे. दरम्यान, पुढील काळात देखील गुन्हेगारांच्या रेकाॅर्डची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

आतापर्यंत ४० तडीपार

२०२४ मध्ये परिमंडळ-२ कार्यक्षेत्रात एमपीडीए कायद्यान्वये चौघांवर, मोक्का कायद्यान्वये दोन गुन्ह्यांतील एकुण १८ गुन्हेगारांवर तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये १८ गुन्हेगारांवर आतापर्यंत तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा –